Shivsena (UBT) | गेल्या काही दिवसांपासू राजकीय वर्तुळात बदल होत असतानाचे चित्र पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena Thackeray group) सांगलीत मोठा धक्का बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात (Shinde group) प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी पक्षप्रवेशाची घोषणा केली आहे. जिल्हाप्रमुख संजय विभूते, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील, मिरजेतील शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव आणि अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
संजय विभूते यांचा राजकीय प्रवास
संजय विभूते (Sanjay Vibhute) यांनी साध्या शिवसैनिकापासून जिल्हाप्रमुखपदापर्यंतचा प्रवास संघर्षातून पूर्ण केला आहे. 2002 मध्ये शाखाप्रमुख म्हणून काम सुरू केल्यानंतर, विभागप्रमुख, उपतालुकाप्रमुख आणि तालुकाप्रमुख म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली आहे. त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे सांगली जिल्ह्यातील शिवसेना संघटन मजबूत झाले होते. विशेषतः शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आंदोलने केली आहेत.
कायमस्वरूपी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी पुरवठा, कृषी धोरणे आणि ग्रामविकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी उचललेले ठोस पावले ही त्यांच्या लोकप्रियतेची कारणे आहेत. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे जिल्ह्यात त्यांची ओळख एका धडाडीच्या नेत्याच्या रूपाने निर्माण झाली आहे.
ठाकरे गटासाठी नवा पेच
या मोठ्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला जिल्ह्यात आणखी आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वीही अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून, ठाकरे गटासाठी ही मोठी गळती मानली जात आहे. सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या आगामी रणनीतीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
राजकीय समीकरणे बदलणार?
सांगलीतील या घडामोडींमुळे स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे गटाच्या बळकटीमुळे आगामी स्थानिक निवडणुकीत कोणते समीकरण निर्माण होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






