EPFO | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाने पीएफ (Provident Fund) सदस्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डिजिटल प्रक्रियेत सुधारणा केल्यानंतर आता ऑनलाइन पीएफ क्लेम केल्यास अवघ्या 24 ते 48 तासांत रक्कम थेट बँक खात्यात जमा होऊ शकते. या बदलामुळे कोट्यवधी सदस्यांना निधी वेळेत मिळणार असून आर्थिक गरजांच्या वेळी मोठा दिलासा मिळणार आहे.
ऑटो-सेटलमेंटमुळे प्रक्रिया झाली वेगवान :
पीएफ दावा निकाली काढण्याची प्रक्रिया अधिक जलद करण्यासाठी EPFO ने तांत्रिक पातळीवर मोठे बदल केले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जवळपास 90 टक्के पीएफ दावे ऑटो-सेटलमेंट प्रणालीद्वारे मंजूर केले जात आहेत. त्यामुळे कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची किंवा अनेक दिवस प्रतीक्षा करण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
आजारपण, लग्न, शिक्षण, घर बांधकाम किंवा इतर आवश्यक कारणांसाठी पीएफमधून पैसे काढणाऱ्या सदस्यांना या नव्या व्यवस्थेचा थेट फायदा होणार आहे. अनेक अर्ज त्याच दिवशी मंजूर होत असून, बहुतांश ऑनलाइन दाव्यांचा निपटारा 24 ते 48 तासांच्या आत केला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
EPFO | BHIM-UPI सुविधा आणि गिग वर्कर्सना लाभ :
EPFO लवकरच भीम-यूपीआय (BHIM-UPI) द्वारे पीएफची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याची सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर निधी हस्तांतरण अधिक वेगवान होईल, व्यवहारांची सुरक्षितता वाढेल आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पुढील काही आठवड्यांत ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
याशिवाय, सरकार सामाजिक सुरक्षा योजनांचा विस्तार करण्यासाठीही पावले उचलत आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील डिलिव्हरी पार्टनर्स, गिग वर्कर्स आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही भविष्यात EPFसारख्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी स्वतंत्र कायदेशीर व्यवस्था तयार करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, EPF ठेवींवरील 8.25 टक्के वार्षिक व्याजदरात कोणताही बदल जाहीर करण्यात आलेला नाही. अलीकडेच EPFO ने 34 कोटींहून अधिक खातेदारांच्या खात्यांमध्ये एकूण 1.44 लाख कोटी रुपयांचे व्याज जमा केले असून, त्याचा लाभ सदस्यांना मिळाला आहे.






