MS धोनीबद्दल ‘या’ दिग्गज खेळाडूने केला मोठा खुलासा!

On: August 3, 2026 5:38 PM
MS Dhoni
---Advertisement---

MS Dhoni | महेंद्रसिंह धोनी याने 2011 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात मारलेला विजयी षटकार आजही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात आहे. त्या षटकाराचा सामना करणारा श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकरा (Nuwan Kulasekara) याने आता त्या क्षणाच्या आठवणींना उजाळा देत धोनीच्या व्यक्तिमत्त्वाबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

विजयी षटकाराची आठवण आजही ताजी :

2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर ठेवलेले 275 धावांचे लक्ष्य 48.2 षटकांत पूर्ण करत जेतेपद पटकावले होते. या विजयावर शिक्कामोर्तब करणारा षटकार धोनीने नुवान कुलसेकराच्या गोलंदाजीवर ठोकला होता. त्या क्षणाची आठवण सांगताना कुलसेकराने कबूल केले की, तो षटकार स्वतःसाठी अत्यंत वेदनादायक होता आणि त्या वेळी त्याला प्रचंड दुःख झाले होते.

मात्र, त्या एका प्रसंगामुळे धोनीबद्दल मनात कोणतीही कटुता नसल्याचेही कुलसेकराने स्पष्ट केले. उलट, धोनी हा मैदानाबाहेर अत्यंत चांगला आणि साधा स्वभावाचा माणूस असल्याचे त्याने सांगितले. कुलसेकरा इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मधील चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचा सदस्य होता. त्याने 2011 मध्ये एक आणि 2012 मध्ये पाच सामने चेन्नईकडून खेळले. त्या काळात धोनीसोबत जवळून वावरताना त्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळीच ओळख झाली.

MS Dhoni | विश्वचषकाविषयी धोनीने कधीच बोललं नाही :

कुलसेकराने सांगितले की, विश्वचषक संपल्यानंतर तो लगेच चेन्नई सुपर किंग्ज संघात सहभागी झाला. त्या काळात अनेकदा धोनीसोबत संवाद झाला, मात्र विश्वचषकातील भारताच्या विजयाचा किंवा स्वतःने मारलेल्या त्या ऐतिहासिक षटकाराचा विषय धोनीने कधीच काढला नाही. त्या सामन्याचा उल्लेख करण्याऐवजी त्याने नेहमी संघाच्या पुढील लक्ष्यांवर आणि आगामी स्पर्धांवरच लक्ष केंद्रित केले.

कुलसेकराच्या मते, धोनीचा सर्वात मोठा गुण म्हणजे तो भूतकाळात अडकून राहत नाही. एकदा एखादी घटना घडून गेली की ती त्याच्यासाठी संपलेली असते. तो कायम वर्तमानातील जबाबदाऱ्यांवर आणि भविष्यात काय साध्य करता येईल, यावरच विचार करतो. शांत, संयमी आणि वास्तववादी स्वभावामुळेच धोनी इतरांपेक्षा वेगळा ठरतो, असे सांगत कुलसेकराने त्याच्या या गुणांचे मनापासून कौतुक केले.

News Title: Kulasekara Reveals Dhoni’s True Nature

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now