Uddhav Thackeray | शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यान दोन पदाधिकाऱ्यांच्या गटांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. या प्रकारामुळे बैठकीतील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले असून, घडलेल्या प्रकारावर उद्धव ठाकरे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित पदाधिकाऱ्यांना फटकारले.
बैठकीतच दोन गट आमनेसामने:
मिळालेल्या माहितीनुसार, आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे (Thane) आणि कल्याण (Kalyan) येथील पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. संघटनात्मक कामकाज आणि पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा सुरू असतानाच दोन वेगवेगळ्या गटांतील पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या वादामुळे काही काळ बैठकीचे वातावरण पूर्णपणे तापले.
घडलेल्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. पक्षाच्या अंतर्गत बैठकीत अशा प्रकारचे वर्तन अजिबात सहन केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघटन मजबूत करण्याऐवजी अंतर्गत वाद घालणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली.
Uddhav Thackeray | अभिजीत दिपके यांचे उदाहरण देत सुनावलं :
यावेळी उद्धव ठाकरे यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांचा उल्लेख करत पदाधिकाऱ्यांना कानउघाडणी केली.
देशातील एक तरुण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आव्हान देण्याचे धाडस दाखवत आहे आणि दुसरीकडे तुम्ही आपापसातच भांडत आहात, अशा शब्दांत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला. तुमच्या या वागण्याला काहीही अर्थ नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.






