Petrol Diesel Price | इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर पाहायला मिळत आहे. युद्धाचे पडसाद गॅस, पेट्रोल डिझेल, सोने-चांदीच्या दरातही पहायला मिळत आहेत. नुकतीच स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत वाढ झाली. किरकोळ वाढीनंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही भडकणार का, अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे.सध्या पेट्रोल डिझेलचे काय दर आहेत यावर एक नजर टाकूया.
इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग असलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) विस्कळीत झाली आहे. यामुळे जागतिक बाजारात ऊर्जेच्या किमती वाढल्या आहेत.मात्र, सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनतेने घाबरण्याचे कोणतेही कारण नाही; भारतात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) किमती वाढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
आजचे (11 मार्च 2026) महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर
मुंबई: पेट्रोल – ₹103.54 / लिटर | डिझेल – ₹90.03 / लिटर
पुणे: पेट्रोल – ₹104.40 / लिटर | डिझेल – ₹90.91 / लिटर
नागपूर: पेट्रोल – ₹104.43 / लिटर | डिझेल – ₹90.98 / लिटर
नाशिक: पेट्रोल – ₹104.40/ लिटर | डिझेल – ₹90.92 / लिटर
छत्रपती संभाजीनगर: पेट्रोल – ₹105.31 / लिटर | डिझेल – ₹91.80/ लिटर
किमती का वाढणार नाहीत? यामागे भारताचे उत्कृष्ट ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’ (Supply Chain Management) आहे. पूर्वी भारताचे सुमारे 40 टक्के कच्चे तेल या होर्मुझच्या मार्गाने येत असे. मात्र, युद्धाचे संकेत मिळताच भारताने आपला मोर्चा पश्चिम आशियाव्यतिरिक्त इतर देशांकडे वळवला. आता भारताची एकूण तेल आयातीपैकी तब्बल 70 टक्के आयात ही पर्यायी आणि सुरक्षित मार्गांवरून होत आहे. म्हणजेच, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील भारताचे अवलंबित्व आता फक्त 30 टक्क्यांवर आले आहे. अनेक नव्या देशांकडून भारताला तेल आणि गॅसचा पुरवठा सुरूही झाला आहे.
भारताकडे 74 दिवसांचा भक्कम तेलसाठा
देशात तेलाचा तुटवडा असल्याची अफवा पसरवली जात असली, तरी त्यात तथ्य नाही. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नुकतेच (9 मार्च रोजी) स्पष्ट केले आहे की, भारताकडे तब्बल 74 दिवस पुरेल इतका भक्कम तेलसाठा (Strategic Reserves) उपलब्ध आहे. सुरुवातीला हा साठा फक्त 13 किंवा 50 दिवसांचा असल्याच्या अफवा होत्या, ज्या सरकारने फेटाळून लावल्या आहेत. कोणत्याही गॅस वितरकाकडे साठ्याची कमतरता नाही.
या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांवर सरकारची करडी नजर आहे. जनतेच्या मनातील भीती आणि संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने तात्काळ एका त्रिसदस्यीय विशेष समितीची स्थापना केली आहे. ही समिती जनतेकडून थेट अभिप्राय घेत असून, दररोजच्या परिस्थितीनुसार नव्या उपाययोजना आखत आहे. त्यामुळे सध्या तरी इंधन दरवाढीचे संकट भारतावर नाही.






