Gen-Z | पेपर लीक प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर केंद्र सरकारने तरुणांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. Gen-Z पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर वाढवण्याची रणनीती आखण्यात आली असून, त्याचाच भाग म्हणून परराष्ट्र मंत्रालयाने स्नॅपचॅटवर अधिकृत उपस्थिती नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थी आंदोलनानंतर सरकारचा डिजिटल फोकस :
पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली (Delhi) येथील जंतर-मंतर (Jantar Mantar) मैदानावर विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन करत सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली होती. या आंदोलनात Gen-Z तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला. त्यानंतर केंद्र सरकारने तरुणांशी संवाद वाढवण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा अधिक प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही इन्स्टाग्राम (Instagram) वरून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणारे व्हिडीओ शेअर केले. तसेच मंत्र्यांनीही विविध सोशल मीडिया माध्यमांवर अधिक सक्रिय राहावे, अशा सूचनाही देण्यात आल्याचे समोर आले आहे.
याच पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने Gen-Z मध्ये लोकप्रिय असलेल्या स्नॅपचॅट (Snapchat) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिकृत खाते सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) यांनी एक्स (X) वरील पोस्टद्वारे याची माहिती दिली. “आता आम्ही Snapchat वरही उपलब्ध आहोत. विविध घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, रंजक माहिती आणि इतर विषयांसाठी आमच्याशी जोडलेले राहा. चला, Snapchat वर भेटूया,” असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Gen-Z | मोदींच्या व्हिडीओनंतर वाढली चर्चा :
जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाल्याची चर्चा रंगली होती. त्यांनी गुरुवारी उशिरा रात्री इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करून विद्यार्थी आणि तरुणांना संबोधित केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी आणखी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत देशातील युवक, विशेषतः Gen-Z तरुण तसेच सर्वसामान्य नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
त्या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी यांनी, “मित्रांनो, काल उशिरा तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. माझ्या व्हिडीओवर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया आणि सकारात्मक सूचना याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुमचे हे प्रेम आणि पाठिंबा कायम राहू द्या. पुढील काळात आपला संवाद आणखी सक्रियपणे सुरू राहील. धन्यवाद मित्रांनो,” असे म्हटले होते. सरकारकडून सोशल मीडिया माध्यमांद्वारे तरुणांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.






