“आंदोलन म्हणजे देशद्रोह नाही, पण…”; GenZ च्या आंदोलनावर मोहन भागवतांचं महत्त्वाचं विधान!

On: August 6, 2026 7:21 PM
Mohan Bhagwat
---Advertisement---

Mohan Bhagwat | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी Gen-Z तरुणांशी संवाद साधताना आंदोलन, लोकशाही, शिक्षण व्यवस्था आणि संवादाच्या महत्त्वावर सविस्तर भूमिका मांडली. आंदोलनाला देशद्रोहाशी जोडणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, संविधानाने दिलेल्या चौकटीत राहून आंदोलन व्हावे, असे सांगत त्यांनी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि संवादाची गरज अधोरेखित केली.

आंदोलन संविधानाच्या चौकटीतच व्हावे :

Gen-Z तरुणांच्या विचारसरणीबद्दल बोलताना मोहन भागवत म्हणाले की, आजची पिढी प्रत्येक प्रश्नामागचे तर्कशुद्ध उत्तर शोधते. पूर्वी मोठ्यांनी सांगितले ते स्वीकारण्याची पद्धत होती, मात्र आता तरुण कोणतीही गोष्ट विचारपूर्वक समजून घेऊ इच्छितात. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक असून, त्यांना प्रेम आणि विश्वासाचीही गरज आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला, असेही त्यांनी नमूद केले.

आंदोलन हे लोकशाही प्रक्रियेचाच एक भाग असल्याचे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, आंदोलन करण्यास ते विरोध करत नाहीत. मात्र, ते संविधानाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार आणि लोकशाही मूल्यांचा आदर राखत व्हायला हवे. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B. R. Ambedkar) यांनी आंदोलनाची चौकट निश्चित केली असून, ती पाळणे आवश्यक आहे. आंदोलनाचा उद्देश व्यवस्था सुधारणे असावा, व्यक्ती किंवा गटांविरोधात वैर निर्माण करणे नव्हे. मतभेद असले तरी संवाद कायम राहिला पाहिजे, कारण संवाद हा लोकशाहीचा मूलभूत आधार असल्याचे त्यांनी सांगितले.

Mohan Bhagwat | शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि संवादावर भर :

“आंदोलन म्हणजे देशद्रोह नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगत मोहन भागवत यांनी आंदोलन करणारेही आपल्या समाजाचाच भाग असल्याचे नमूद केले. जेन-झी आणि अल्फा पिढी अधिक प्रामाणिक असल्याचे त्यांनी सांगितले आणि देशभक्तीसाठीही हाच प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले.

तसेच दिल्ली येथील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जबाबत आपल्याकडे संपूर्ण माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ बातम्यांच्या आधारे निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे सांगत, संपूर्ण वस्तुस्थिती समोर आल्यानंतरच जबाबदारी निश्चित करावी, असेही त्यांनी नमूद केले.

News Title: Mohan Bhagwat on Gen-Z Protests

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now