India oil reserves | मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण इस्राईल युद्धा मुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. या संघर्षाचा परिणाम तेल पुरवठ्यावर होण्याची शक्यता असल्याने अनेक देश चिंतेत आहेत. भारतासारख्या मोठ्या ऊर्जा आयात करणाऱ्या देशासाठी ही परिस्थिती विशेषतः गंभीर मानली जात आहे.
युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठे चढउतार दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर काही दिवसांपूर्वी प्रति बॅरल 115 डॉलरपर्यंत गेले होते, तर सध्या ते सुमारे 85 डॉलरच्या आसपास आहेत. तणाव वाढत राहिल्यास भविष्यात हे दर 150 ते 200 डॉलरपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
भारताकडे किती तेलाचा राखीव साठा आहे? :
भारताकडे सध्या अंदाजे 250 मिलियन बॅरल कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने राखीव स्वरूपात आहेत. लिटरमध्ये पाहिल्यास हा साठा सुमारे 4000 कोटी लिटर इतका असल्याचे सांगितले जाते. देशाच्या गरजा लक्षात घेता हा साठा साधारण सात ते आठ आठवडे म्हणजे जवळपास दोन महिने पुरेल इतका आहे.
भारताची ऊर्जा गरज प्रचंड असल्यामुळे देशातील एकूण कच्च्या तेलाच्या गरजांपैकी सुमारे 90 टक्के तेल आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती आणि पुरवठा साखळीतील बदलांचा भारतावर थेट परिणाम होतो.
India oil reserves | भारत किती देशांकडून तेल मागवतो? :
सुमारे दहा वर्षांपूर्वी भारत 27 देशांकडून कच्चे तेल आयात करत होता. मात्र ऊर्जा सुरक्षिततेसाठी धोरण बदलून आता भारत जवळपास 40 देशांकडून तेल आयात करतो. यामध्ये रशिया, अमेरिका, पश्चिम आफ्रिका आणि मध्य आशियातील अनेक देशांचा समावेश आहे.
जागतिक तेल वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला Strait of Hormuz हा समुद्री मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताच्या आयातीपैकी सुमारे 40 टक्के कच्चे तेल या मार्गाने येते. जगातील सुमारे 20 टक्के तेल वाहतूकही याच मार्गावरून होते, त्यामुळे या भागातील तणावाचा परिणाम थेट जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
कच्च्या तेलाचा वापर किती वस्तूंमध्ये होतो?
कच्च्या तेलाचा वापर केवळ पेट्रोल-डिझेल तयार करण्यापुरता मर्यादित नाही. तज्ज्ञांच्या मते, जगभरात सुमारे 6000 पेक्षा अधिक वस्तू बनवण्यासाठी कच्च्या तेलाचा वापर कच्चा माल म्हणून केला जातो.
पेट्रोल, डिझेल, जेट फ्यूल, एलपीजी, केरोसिन यांसारखी इंधने तर त्यापासून तयार होतातच, पण प्लास्टिक, पॉलिएस्टर, नायलॉन, सिंथेटिक लेदर, वैद्यकीय उपकरणे, कॉस्मेटिक्स आणि डांबर यांसारख्या अनेक वस्तूंच्या निर्मितीतही कच्च्या तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या तर त्याचा थेट परिणाम महागाईवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.






