Solapur Traffic Diversion | 9 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस यांनी वाहतुकीत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. मुख्य मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी राहणार असून नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
मिरवणुकीमुळे मुख्य रस्ते राहणार बंद :
सोलापूर (Solapur) शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार (M. Rajkumar) यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार रविवार, 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत विशेष वाहतूक व्यवस्था लागू राहणार आहे. या कालावधीत मिरवणुकीत सहभागी होणारी वाहने तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळता इतर सर्व वाहनांना मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर प्रवेश दिला जाणार नाही.
या काळात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक, रामलाल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चार हुतात्मा पुतळा, खान मशीद, सरस्वती चौक, नवीवेस चौकी, मेकॅनिक चौक, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अॅम्बेसेडर हॉटेल (Ambassador Hotel) या प्रमुख मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Solapur Traffic Diversion | नागरिकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित :
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी विविध दिशांसाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. जुळे सोलापूर (Jule Solapur) येथून मंगळवेढाकडे जाणाऱ्या वाहनांनी पत्रकार भवन चौक, महावीर चौक, गुरुनानक चौक, संत तुकाराम चौक, अशोक चौक, शांती चौक, जुना तुळजापूर नाका, जुना पुना नाका आणि नवीन बायपास मार्गाचा वापर करावा. तर मंगळवेढ्याकडून शहरात येणाऱ्या वाहनांसाठी नवीन बायपास, पुणे हायवे (Pune Highway), बाळे (Bale), जुना पुना नाका, सातरस्ता (Satrasta), रंगभवन चौक, क्रॉसरोड, मार्केट यार्ड (Market Yard) आणि हैदराबाद रोड (Hyderabad Road) हा पर्यायी मार्ग उपलब्ध राहणार आहे.
याशिवाय रेल्वे स्थानकावरून बसस्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी रेल्वे स्टेशन, बाकळे प्रेस कॉर्नर, भावसार पथ, समाचार चौक, कोतम चौक, कुंभारवेस आणि बलिदान चौक या मार्गाचा वापर करावा. तर जुना पुना नाक्याकडून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्यांसाठी जुना कारंबा नाका, शांती चौक आणि सातरस्ता हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे तसेच निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करावा, असे आवाहन सोलापूर शहर पोलिसांनी केले आहे.






