Ajinkya Rahane | भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याच्या पुढील कारकिर्दीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. कोच किंवा समालोचक म्हणून तो दिसेल, अशीही चर्चा होती. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत रहाणेने पुन्हा एकदा व्यावसायिक क्रिकेटच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून तो आता युरोपियन टी20 प्रीमियर लीग (European T20 Premier League) स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
एम्स्टर्डम फ्लेम्सकडून मैदानात उतरणार :
युरोपियन टी20 प्रीमियर लीग 2026 च्या उद्घाटन हंगामासाठी अजिंक्य रहाणेची एम्स्टर्डम फ्लेम्स (Amsterdam Flames) संघात निवड करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व मिचेल मार्श (Mitchell Marsh) करणार असून संघात स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि टिम डेविड (Tim David) यांसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवी खेळाडूही सहभागी आहेत. त्यामुळे रहाणेला जागतिक दर्जाच्या क्रिकेटपटूंसोबत पुन्हा खेळण्याची संधी मिळणार आहे.
शुक्रवारी फ्रँचायझीकडून अधिकृत घोषणा करत अजिंक्य रहाणेची मार्की प्लेयर म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती देण्यात आली. कोणत्याही लीगमधील सर्वाधिक प्रतिष्ठेचे, लोकप्रिय आणि संघासाठी महत्त्वाचे खेळाडू मार्की प्लेयर म्हणून ओळखले जातात. अशा खेळाडूंना संघात घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये मोठी स्पर्धा असते. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढते, स्टेडियममध्ये गर्दी होते आणि टीव्हीवरही मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आकर्षित होतात. या स्पर्धेत भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विन (R. Ashwin) याच्यासह अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटूही सहभागी होणार आहेत.
Ajinkya Rahane | फ्रँचायझीकडून रहाणेचं विशेष स्वागत :
एम्स्टर्डम फ्लेम्सचे सह-संस्थापक स्टीव वॉ (Steve Waugh) यांनी अजिंक्य रहाणेचे संघात स्वागत करत त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि क्रिकेटमधील योगदानाचे कौतुक केले. त्यांच्या मते, रहाणेकडे उत्कृष्ट फलंदाजीसोबत नेतृत्व क्षमता, नम्र स्वभाव आणि व्यावसायिक क्रिकेटपटूकडे असावेत असे सर्व गुण आहेत. मैदानावरील त्याच्या शिस्तबद्ध वागणुकीमुळेही त्याने जगभरातील क्रिकेटविश्वात वेगळा आदर मिळवला असल्याचे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेची कामगिरीही उल्लेखनीय राहिली आहे. त्याने भारतासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 5,077 धावा आहेत, तर एकदिवसीय सामन्यांत त्याने 2,962 धावा केल्या. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 375 धावांचे योगदान दिले. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर युरोपियन टी20 प्रीमियर लीगमध्ये खेळत तो आपल्या कारकिर्दीची नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे.






