Vijay Thalapathy | तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय (C. Joseph Vijay) उर्फ विजय थलपती (Vijay Thalapathy) आणि त्यांची पत्नी संगिता चेंगलपट्टू (Sangeetha Chengalpattu) यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला आता अनपेक्षित वळण मिळाले आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये दाखल करण्यात आलेली घटस्फोटाची याचिका संगिता यांनी न्यायालयातून मागे घेतली असून त्यामुळे या प्रकरणाची अधिकृत सांगता झाली आहे. न्यायालयानेही अर्ज मागे घेतल्याची नोंद करत खटला निकाली काढला आहे.
कोर्टात याचिका मागे, खटल्याची सांगता :
गेल्या काही महिन्यांपासून विजय आणि संगिता यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर 7 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान संगिता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजेरी लावली. यावेळी त्यांनी हा खटला पुढे चालवण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट करत याचिका मागे घेण्यामागील कारण न्यायालयाला सांगितले.
दरम्यान, संगिता यांची भूमिका ऐकल्यानंतर न्यायालयाने अर्ज मागे घेतल्याचे ग्राह्य धरत संपूर्ण प्रकरण निकाली काढले. यापूर्वी 15 जून रोजी झालेल्या सुनावणीत स्थानिक न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 7 ऑगस्टची तारीख निश्चित केली होती. त्या दिवशीच या प्रकरणावर अंतिम पडदा पडला.
Vijay Thalapathy | फेब्रुवारीत गंभीर आरोपांसह दाखल झाली होती याचिका :
विजय आणि संगिता यांच्यातील कायदेशीर वादाची सुरुवात फेब्रुवारी 2026 मध्ये झाली होती. स्पेशल मॅरेज ॲक्ट, 1954 अंतर्गत संगिता यांनी चेंगलपट्टू (Chengalpattu) न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. या याचिकेत विवाह संपुष्टात आणण्याची मागणी करत त्यांनी विजय यांच्यावर विवाहबाह्य संबंध, मानसिक छळ, दुर्लक्ष आणि साथ सोडल्याचे गंभीर आरोप केले होते.
त्यांचा दावा होता की 2021 मध्ये विजय यांचे अभिनेत्री तृष्णा (Trisha) यांच्यासोबत संबंध असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. हे संबंध संपवण्याचे आश्वासन देऊनही ते कायम राहिल्यामुळे आपल्याला मोठ्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागल्याचे त्यांनी नमूद केले होते. तसेच विजय हळूहळू कुटुंबापासून दूर गेले, सार्वजनिक आणि व्यावसायिक कार्यक्रमांपासून त्यांना दूर ठेवले आणि भावनिक, शारीरिक तसेच आर्थिक सहकार्यही थांबवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.






