IPL Player Amit Mishra | माजी आयपीएल (IPL) क्रिकेटपटू अमित मिश्रा याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्याची पत्नी मॉडेल गरिमा तिवारी हिने अमित आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध अनेक गंभीर आरोप केले आहेत. हुंड्यासाठी छळ, शारीरिक हिंसाचार आणि जीव देण्यास प्रवृत्त केल्याचे धक्कादायक आरोप केले आहेत. उपाशी ठेवून दारु पिऊन मारहणार करत असल्याचंही गरिमाने तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे आता माजी आयपीएल क्रिकेटपटू अमित मिश्रा चांगलाच अडचणीत सापडला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? याविषयी जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
कानपूरच्या फीलखाना परिसरात राहणाऱ्या गरिमा तिवारी आणि अमित मिश्रा यांचा विवाह 26 एप्रिल 2021 रोजी झाला होता. गरिमाने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी हुंड्यामध्ये ‘होंडा सिटी’ (Honda City) कार आणि 10 लाख रुपयांची मागणी करत तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. गरिमा ही पेशाने मॉडेल असून, ती मॉडेलिंगमधून जे काही पैसे कमवत होती, ते सर्व पैसे अमित तिच्याकडून जबरदस्तीने हिरावून घेत असल्याचा आरोप तिने केला आहे.
अमित मिश्रावर पत्नीने अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आरोप केले आहेत. गरिमाने सांगितले की, अमित दररोज दारू पिऊन तिला शिवीगाळ आणि बेदम मारहाण करत असे. अनेकदा तिला घरात उपाशी ठेवले जायचे आणि वारंवार घटस्फोटाची धमकी दिली जायची. या सततच्या जाचाला कंटाळून गरिमा नैराश्याच्या (Depression) गर्तेत गेली आणि तिचे मॉडेलिंगचे कामही सुटले.
पोलिसांनी दखल न घेतल्याने थेट कोर्टात धाव
हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्यांनी अखेर मार्च 2024 मध्ये गरिमाला घरातून हाकलून दिले. गरिमाचे वकील करीम सिद्दीकी यांनी माहिती दिली की, तिने सुरुवातीला फीलखाना पोलीस ठाण्याच्या प्रभारींची वैयक्तिक भेट घेऊन तक्रार अर्ज दिला होता. मात्र, पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे अखेर तिने ‘अपर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग’ (Upper Civil Judge Senior Division) यांच्या न्यायालयात दाद मागितली आहे. या प्रकरणात पती अमितसह सासू बीना, सासरे शशिकांत, दीर अमर, जेठाणी रितू आणि नणंद स्वाती यांच्यावरही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे.






