Santosh Deshmukh Case | बीड जिल्ह्यातील चर्चित सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी जयराम चाटे याला न्यायालयाने मर्यादित वेळेसाठी जेलबाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. भावाच्या निधनानंतर होणाऱ्या धार्मिक विधीत सहभागी होण्यासाठी त्याला विशेष सवलत देण्यात आली असून तब्बल १४ महिन्यांनंतर तो कडक पोलिस बंदोबस्तात कारागृहातून बाहेर आला.
धार्मिक विधीसाठी न्यायालयाची विशेष परवानगी :
बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणात आरोपी असलेला जयराम चाटे (Jayaram Chate) दीर्घकाळापासून बीड जिल्हा कारागृहात होता. दरम्यान, त्याच्या भावाचे २ मार्च रोजी निधन झाले. त्यानंतर होणाऱ्या बाराव्या (उत्तरकार्य) विधीस उपस्थित राहण्यासाठी आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता.
या अर्जावर ६ मार्च रोजी जिल्हा व विशेष न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे (Balasaheb Kolhe) यांनी या मागणीला विरोध नोंदवला होता. मात्र, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मर्यादित वेळेत परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आरोपी जयराम चाटेला सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत कडक पोलिस बंदोबस्तात धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे.
Santosh Deshmukh Case | कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा चर्चेत :
न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीला पोलिस बंदोबस्ताचे सर्व खर्च स्वतः उचलावे लागणार आहेत. तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या अटी आणि नियमांचे काटेकोर पालन करणे त्याच्यासाठी बंधनकारक आहे. सध्या तो पोलिसांच्या तगड्या सुरक्षा व्यवस्थेतून आपल्या तांबवा (Tambwa) या मूळ गावी नेण्यात आला आहे, जिथे त्याच्या भावाच्या बाराव्या विधीचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, या निर्णयावर मृत सरपंचांचे भाऊ धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी प्रश्न उपस्थित केले. धार्मिक कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणात वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनीही न्यायालयात आपले मत मांडताना हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याचे नमूद केले. राज्यभर चर्चेत असलेल्या या प्रकरणात कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.






