LPG Gas Shortage| राज्यातील अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात एलपीजी गॅस सिलिंडर (Gas Cylinder)मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. काही ठिकाणी घरपोच डिलिव्हरी उशिरा होत असल्याने लोकांना थेट गॅस एजन्सीकडे जाऊन सिलिंडर घ्यावे लागत आहेत. परिणामी अनेक ठिकाणी एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
नागरिकांच्या मते, गॅस बुकिंगसाठी दिलेले काही फोन नंबर सतत व्यस्त किंवा बंद लागत असल्याने गैरसोय वाढली आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी थेट एजन्सीकडे जाऊन चौकशी करण्याचा मार्ग निवडला आहे. काही ठिकाणी तीन-चार तास रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळेल की नाही याबाबत अनिश्चितता असल्याने लोकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
अनेक जिल्ह्यांत एकसारखी परिस्थिती
बीड, धुळे, जळगाव, गडचिरोली आणि मुंबईच्या काही भागांत अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. धुळे शहरातील एका गॅस एजन्सीवर तर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही सिलिंडरसाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याचे दिसून आले. नोंदणी करूनही वेळेवर घरपोच सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांनी एजन्सीकडे गर्दी केली.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातही सकाळपासून गॅस एजन्सीबाहेर मोठी गर्दी होत आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक सिलिंडर मिळणार नाही या भीतीने आधीच एजन्सीकडे जाऊन रांगेत उभे राहत आहेत.
मुंबईतही समस्या
मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर भागात गॅस पाइपलाइनची सुविधा नसल्याने नागरिक पूर्णपणे सिलिंडरवर अवलंबून आहेत. येथे पहाटेपासूनच महिलांपासून वृद्धांपर्यंत अनेक लोक सिलिंडरसाठी रांगेत उभे असल्याचे चित्र दिसले. प्रशासनाचा दावा आणि नागरिकांची मागणी
दरम्यान प्रशासनाकडून गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही ग्राहकांनी कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोपही केला आहे.
नागरिकांनी गॅस बुकिंग प्रणाली सुरळीत करण्याची आणि घरपोच सेवा पुन्हा नियमित करण्याची मागणी केली आहे. तसेच राज्यभर गॅस पुरवठ्याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणीही होत आहे.








