Narhari Zirwal | रायगड जिल्ह्यातील (Raigad) कर्जत येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar group) च्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी आपल्या दिलखुलास भाषणातून उपस्थित कार्यकर्त्यांना हास्यसागरात बुडवले.
“मी देखील राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो,” या त्यांच्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हास्याचा कडकडाट उसळला. यावेळी त्यांनी आपल्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदाच्या कार्यकाळातील अनुभव सांगताना सभागृहाचे यशस्वी संचालन हेही एक प्रकारचं नेतृत्वच असल्याचं ठामपणे मांडलं.
ते म्हणाले, “गेल्या पाच वर्षांमध्ये 288 आमदारांचं सभागृह मी यशस्वीपणे चालवलं. त्यामुळे कोणतंही खातं सांभाळण्याची ताकद माझ्यात आहे. मी मुख्यमंत्री होण्याचं विधान काही महिने आधी केलं होतं. तेव्हा लोकांनी त्याला विनोद समजलं, पण त्यामागे अनुभव आणि आत्मविश्वास होता.” त्यांच्या या विधानाने मेळाव्यातील कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली.
झिरवाळ म्हणाले, ‘नेतृत्वाचं व्हिजन महत्त्वाचं’
झिरवाळ पुढे म्हणाले की, कोणताही नेता मोठा असो वा लहान, जर तो सामान्य कार्यकर्त्याच्या हातातही मोठी जबाबदारी देतो, तर त्याच्याकडे दूरदृष्टीचा व्हिजन असतो. राष्ट्रवादी पक्षात (NCP) अशा दूरदृष्टीच्या नेत्यांची कमतरता नाही. त्यांनी सांगितले की, “आमच्या पक्षात जात, धर्म हे गौण मुद्दे आहेत. एखादा कार्यकर्ता किती कामाचा आहे, हेच आमच्यासाठी महत्त्वाचं असतं.”
ते म्हणाले, “नेतृत्व मिळालं की त्याचा उपयोग जनतेसाठी करायला हवा. माझं सभागृह चालवण्याचं अनुभव हेच दाखवतं की, मी कोणत्याही जबाबदारीस पात्र आहे.” त्यांच्या या परखड आणि थेट भाषणाने उपस्थितांमध्ये जोश निर्माण झाला. झिरवाळांच्या दिलखुलास शैलीने पुन्हा एकदा सिद्ध झालं की, विनोदाच्या माध्यमातूनही गंभीर मुद्दे प्रभावीपणे मांडता येतात.






