Prasanna Sankar | रिपलिंग (Rippling) कंपनीचे संस्थापक प्रसन्ना शंकर (Prasanna Shankar) सध्या त्यांच्या वैयक्तिक जीवनातील संघर्षामुळे चर्चेत आहेत. त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून आपल्या घटस्फोट, पत्नीचा अफेअर आणि मुलाच्या कस्टडीशी संबंधित गंभीर गोष्टी उघड केल्या आहेत. प्रसन्ना यांनी पत्नीवरच नव्हे तर चेन्नई पोलिसांवरही छळ केल्याचा आरोप लावला आहे. दुसरीकडे, त्यांच्या पत्नी दिव्या शशिधर (Divya Shashidhar) यांनी या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे.
प्रसन्ना शंकर कोण आहेत?
प्रसन्ना शंकरनारायणन (Prasanna Sankaranarayanan) हे तामिळनाडूच्या (Tamil Nadu) चेन्नई (Chennai) येथे जन्मलेले एक नामवंत भारतीय उद्योजक आहेत. त्यांनी $10 अब्ज मूल्य असलेल्या टेक कंपनी रिपलिंगची स्थापना केली होती. याशिवाय त्यांनी 0xPPL.com नावाचे क्रिप्टो सोशल नेटवर्क देखील सुरू केले आहे. त्यांनी त्रिचिच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) मधून संगणक विज्ञानात पदवी मिळवली आहे.
रिपलिंग सुरू करण्याआधी ते 2006 मध्ये गुगलमध्ये इंटर्न होते आणि त्यानंतर मायक्रोसॉफ्ट कॅनडामध्येही त्यांनी काम केले आहे. विशेष म्हणजे, त्यांची पत्नी दिव्या शशिधर यांची ओळखही त्यांना NITमध्ये शिक्षण घेताना झाली होती.
पत्नीवर अफेअर आणि मुलाच्या अपहरणाचे आरोप
प्रसन्ना शंकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट्समध्ये दावा केला की, त्यांच्या पत्नीचे अनूप नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते आणि त्यामुळेच त्यांचा घटस्फोट झाला. त्यांनी या आरोपांना पुष्टी देण्यासाठी काही स्क्रीनशॉट्सही शेअर केले आहेत. प्रसन्नाच्या म्हणण्यानुसार, हे स्क्रीनशॉट त्याला अनूपच्या पत्नीने पाठवले होते. यात कंडोम खरेदी करण्यास सांगणं आणि केवळ दोन जणांसाठी हॉटेल बुकिंग केल्यासारख्या गोष्टी नमूद आहेत.
याशिवाय, प्रसन्ना यांनी दिव्याने त्यांच्या 9 वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. तर दिव्या यांनी दावा केला आहे की, गोकुल नावाचा एक व्यक्ती मुलाला घेऊन गेला असून त्यांचं अपहरण होऊ शकतं. मात्र, प्रसन्ना यांनी पोलिसांना मुलगा सुरक्षित असल्याचे सर्व पुरावे सादर केल्याचा दावा केला आहे.






