Walmik Karad | बीड जिल्ह्यातील मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याला कारागृहात नियमबाह्य सुविधा मिळत असल्याचा गंभीर आरोप पुन्हा चर्चेत आला आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी माध्यमांशी संवाद साधताना या संदर्भात अनेक धक्कादायक दावे केले असून कारागृह प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कारागृहातील सुविधांबाबत गंभीर दावे :
डिसेंबर 2024 मध्ये संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आणि तपासादरम्यान मुख्य आरोपी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली. सध्या तो बीड जिल्हा कारागृहात असून त्याला तेथे नियमांच्या विरोधात विशेष सुविधा पुरवल्या जात असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी सांगितले की, त्यांनी कारागृह निरीक्षक आणि मुख्यमंत्री यांना याबाबत लेखी पत्र पाठवले आहे. गेल्या दीड वर्षातील घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी कारागृहातील व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, कारागृहात जेलर बदलले गेले असले तरी अनेक प्रकार सुरूच आहेत. काही अधिकाऱ्यांना अंधारात ठेवले जात असून कैद्यांच्या नावावर असलेल्या सिमकार्डचा वापर केला जात आहे. दररोज दीड ते अडीच तास बाहेरील व्यक्तींशी संवाद साधला जात असल्याचा दावा करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
Walmik Karad | आरोपीच्या बदलीची मागणी, सुळेंचीही प्रतिक्रिया :
धनंजय देशमुख यांनी पुढे सांगितले की, गेल्या दीड वर्षांपासून या प्रकरणातील आरोपींना दुसऱ्या कारागृहात हलवण्याची मागणी केली जात आहे. काही आरोपींची अन्य तुरुंगात रवानगी झाली असली तरी या प्रकरणाची इतर घटनांशी तुलना होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार पुत्र सौरव सोनवणे (Saurav Sonawane) यांच्या प्रकरणासाठी कुठेही मोर्चे निघाले नाहीत, तसेच घुले आणि देशमुख प्रकरणे वेगवेगळी असल्याचे त्यांनी नमूद केले. एका आरोपीने सुरुवातीला लातूर कारागृहात हलवण्याची मागणी केली आणि नंतर बीड कारागृहातच राहण्याची इच्छा व्यक्त केल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
सुप्रिया सुळेंनी मंडळी भूमिका :
दरम्यान, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही त्यांच्या अधिकृत एक्स (X) खात्यावर या प्रकरणाबाबत भूमिका मांडली. त्यांनी धनंजय देशमुख यांच्या पत्राचा उल्लेख करत वाल्मिक कराडला राजकीय प्रभावातून बेकायदेशीर सुविधा मिळत असल्याचा गंभीर आरोप असल्याचे म्हटले. इतर कैद्यांच्या नावावरील तसेच वकिलांच्या सिमकार्डच्या माध्यमातून बाहेरील व्यक्तींशी संपर्क, दुपारच्या बंदीच्या काळात अधीक्षक कार्यालयातून व्हिडिओ कॉलची सुविधा, बराक क्रमांक ९ जवळील फोन परिसरात सीसीटीव्ही नसणे आणि कारागृहातूनच बाहेरील परिस्थितीवर प्रभाव टाकण्याचे आरोप पत्रात नमूद असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय आरोपीची नागपूर मध्यवर्ती कारागृह (Nagpur Central Prison) येथे तातडीने रवानगी करावी, बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी करावी तसेच आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. देशमुख कुटुंबाला न्याय मिळणे हेच प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






