Weather Update | मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा देशभरातील हवामानासाठी अत्यंत बदलाचा ठरणार आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, २६ आणि २८ मार्च रोजी उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत हवामानात मोठी उलथापालथ होणार आहे.
पश्चिम भारतावरील सक्रिय उपोष्णकटिबंधीय पश्चिमी जेट प्रवाहामुळे महाराष्ट्रातील हवामानातही मोठे बदल होणार आहेत. २५ आणि २६ मार्च दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता आहे.आंध्र प्रदेशची उत्तर किनारपट्टी आणि कर्नाटकाच्या काही भागांमध्येही पावसाचा अंदाज आहे. या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आणि गारपिटीमुळे केळी, पपई यांसारख्या उभ्या पिकांचे आणि मातीच्या घरांचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे.
वाढता उकाडा आणि उष्णतेची लाट
एकीकडे पावसाचे सावट असतानाच, देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा ३६ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि ओडिशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. आगामी चार दिवसांत उत्तर भारतात ३ ते ५ अंशांनी, मध्य भारतात २ ते ४ अंशांनी आणि पूर्व भारतात ४ ते ६ अंशांनी तापमानात वाढ होणार आहे. केरळ आणि गोव्यामध्ये वाढत्या दमट हवामानामुळे नागरिकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागू शकतो.
हवामान खात्यानुसार, पहिली पश्चिमी प्रणाली २६ मार्चपासून तर दुसरी २८ मार्चच्या रात्रीपासून सक्रिय होईल. यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशातील उंच पर्वतीय भागांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. हा प्रभाव २७ मार्च रोजी उत्तराखंडमध्येही पाहायला मिळेल. या काळात ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहतील. मैदानी राज्यांचा विचार केल्यास, २६ मार्च रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाची आणि दिल्लीत धुळीच्या वादळाची शक्यता आहे. २८ मार्चला राजस्थानमध्येही असेच हवामान राहील, ज्यामुळे जनजीवनावर परिणाम होऊ शकतो.
चक्रीवादळाच्या स्थितीमुळे ईशान्य भारतात हवामान अधिक सक्रिय झाले आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने तिथे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला. याशिवाय नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि गारपिटीचा मोठा धोका आहे.






