Weather Update | देशभरात सध्या हिवाळ्याने चांगलाच जोर धरला असून अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये तापमान लक्षणीयरीत्या घसरले असून पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांत थंडीची तीव्रता वाढताना दिसत आहे. (IMD Weather Update)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत पावसाने हजेरी लावली होती तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान होते. त्यामुळे काही भागात थंडी थोडी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा हवामान कोरडे होत असून सकाळ-संध्याकाळ कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. अशातच आज म्हणजेच 8 जानेवारीपासून देशभरात हवामानात मोठा बदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
उत्तर भारतात थंडी आणि दाट धुके; तापमानात मोठी घसरण :
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 8 जानेवारीपासून उत्तराखंड, पंजाब, पूर्व उत्तर प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली या भागांमध्ये दिवसभर थंड हवामान राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, छत्तीसगड आणि झारखंडसह अनेक राज्यांमध्ये किमान तापमान पाच ते दहा अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जात आहे. (Rain Alert South India)
छत्तीसगडमधील अंबिकापुर येथे किमान तापमान 3.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याची नोंद आहे. जम्मू-काश्मीर, लडाख आणि डोंगराळ भागांमध्ये तीव्र थंडीचा (Cold Wave in India) अनुभव येत असून अनेक ठिकाणी तापमान शून्याखाली गेले आहे. पुढील तीन दिवस पूर्व राजस्थान, बिहार, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Weather Update | दक्षिण भारतात पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली :
एकीकडे उत्तर भारतात थंडी आणि धुक्याचा इशारा देण्यात आला असताना, दुसरीकडे दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 8 ते 11 जानेवारी दरम्यान तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात पावसाचा धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
याशिवाय केरळ आणि माहे येथेही पावसाची शक्यता असून येथे देखील वादळासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने संबंधित राज्यांतील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. येत्या काही दिवसांत देशाच्या विविध भागांमध्ये हवामानाचा मोठा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.






