Weather Update| राज्यात उष्णतेचा जोर वाढत असताना आता हवामानात अचानक बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. गुढीपाडव्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक भागांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः विदर्भातील काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला असून पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 ते 20 मार्चदरम्यान कोकण वगळता राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या काळात वातावरणात मोठा बदल होणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक ढगाळ स्थिती निर्माण होऊ शकते.
दरम्यान, सोमवारी विदर्भातील वाशिममध्ये राज्यातील सर्वाधिक 40.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुण्यात रात्रीचे तापमान 16.4 अंशांपर्यंत खाली आल्याने काही प्रमाणात गारवा जाणवला. मात्र पुढील दिवसांत ढगाळ वातावरणामुळे रात्री उकाडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गारपीट आणि पावसाचा इशारा
बुधवार, 18 मार्च रोजी अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. याशिवाय मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर), सातारा, सांगली आणि सोलापूर येथे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
18 मार्चपासून मुंबई (Mumbai) तसेच कोकण भागात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढू शकतो.
उष्णतेचा प्रभाव कायम राहणार
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या उत्तर कोकण भागासह नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या एकूण १३ जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे. दिवसाच्या तुलनेत रात्री दमट हवेमुळे अधिक उकाडा जाणवू शकतो, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
सध्या राज्यात उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस आणि गारपीट या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे दिसून येत आहेत. यामुळे काढणीला आलेल्या पिकांवर तसेच फळबागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाचे योग्यरित्या संरक्षण करावे. तसेच नागरिकांनीही बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






