Vinesh Phogat l हरियाणा सरकारने कुस्तीपटू आणि सध्या काँग्रेस आमदार असलेल्या विनेश फोगट (Vinesh Phogat ) यांना ऑलिंपिक पदक विजेत्यांच्या बरोबरीचे तीन पर्याय देत सन्मानित करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र विनेशने त्यातल्या ४ कोटी रुपयांच्या रोख रकमेचा पर्याय स्वीकारत सरकारकडून मिळणाऱ्या इतर सवलती नाकारल्या आहेत.
सरकारी नोकरी नको, भूखंडही नको! :
पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये तांत्रिक अपात्रतेमुळे सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या विनेश फोगटला (Vinesh Phogat ) हरियाणा सरकारकडून विशेष सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी विनेशसमोर तीन पर्याय ठेवले होते —
गट ‘अ’ अंतर्गत सरकारी नोकरी
भूखंड (जमीन)
चार कोटी रुपयांचे रोख बक्षीस
त्यावर विनेशने स्पष्टपणे रोख बक्षिसाची मागणी करत इतर पर्याय नाकारले आहेत. आता ती हरियाणाच्या जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार म्हणून कार्यरत आहे, त्यामुळे तिने सरकारी नोकरीची गरज भासणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळतात.
Vinesh Phogat l क्रीडा कामगिरीबद्दल मिळालेला हा सन्मान :
मुख्यमंत्री सैनी यांनी यापूर्वी विधानसभेत सांगितले होते की, विनेश ही आमच्या राज्याची मुलगी आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये अपात्र झाल्यानंतरही तिच्या कष्ट आणि कौशल्याचा सन्मान म्हणून ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्यांच्या दर्जाने सन्मान दिला जाईल. त्यानुसार विनेशला राज्य क्रीडा धोरणात अपेक्षित असलेले तीन पर्याय देण्यात आले.
राज्य क्रीडा विभागाकडे पाठवलेल्या पत्रात विनेशने चार कोटींचे रोख बक्षीसच स्वीकारायचे आहे, असा स्पष्ट निर्णय कळवला आहे. यामुळे तिच्या कार्यक्षमतेला आणि त्यागाला सरकारकडून आर्थिक स्वरूपात मान्यता देण्यात आली आहे.






