भररस्त्यात ‘या’ प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर झाडल्या गोळ्या; सोशल मीडियावर खळबळ

On: August 7, 2026 1:49 PM
Cesar Gastelum
---Advertisement---

Cesar Gastelum | मेक्सिको (Mexico) मधून सोशल मीडियाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर सीझर गॅस्टेलम (Cesar Gastelum) यांची लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू असतानाच भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही संपूर्ण घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

LIVE स्ट्रिमिंग सुरू असतानाच हल्ला :

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सिनालोआ (Sinaloa) राज्याची राजधानी कुलियाकान (Culiacán) येथे घडली. मंगळवारी सीझर गॅस्टेलम आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. प्राथमिक तपासानुसार या हत्येचा संबंध स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांमधील हिंसाचाराशी असू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणासाठी अद्याप कोणत्याही विशिष्ट गटाला अधिकृतपणे जबाबदार ठरवण्यात आलेले नाही.

घटनास्थळावरील व्हिडीओनुसार, सीझर गॅस्टेलम एका KFC च्या पार्किंगमध्ये आपल्या दोन मित्रांसोबत गप्पा मारत उभे होते. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एकाने बंदूक काढून त्यांच्यावर सलग गोळ्या झाडल्या. गोळीबार होताच परिसरात एकच गोंधळ उडाला, तर हल्लेखोरांनी काही क्षणांतच मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पलायन केले. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Cesar Gastelum | तपासाला वेग, राष्ट्राध्यक्षांचे आश्वासन :

तपासादरम्यान अधिकाऱ्यांच्या हाती अशी माहिती आली आहे की, सीझर गॅस्टेलम यांनी यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या काही व्हिडिओंमध्ये एका गुन्हेगारी गटाचा उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणा विविध शक्यतांचा विचार करत असून हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

या प्रकरणानंतर मेक्सिको (Mexico) च्या राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शेनबाम (Claudia Sheinbaum) यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल, असे आश्वासन दिले. सीझर गॅस्टेलम हे सोशल मीडियावर लोकप्रिय चेहरा होते. TikTok वर त्यांचे सुमारे 6.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते, तर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. त्यांच्या हत्येनंतर चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

News Title: Mexican Influencer Shot During Livestream

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now