Santosh Deshmukh | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या प्रकरणी सीआयडीने (CID) दाखल केलेल्या आरोपपत्रात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण करतानाचे व्हिडिओ, फोटो आणि फोनवरील संभाषणे यांचा आरोपपत्रात समावेश आहे. यापैकीच एक व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये, संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना मारण्यापूर्वी वाल्मिक कराड आणि आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यामध्ये झालेले संभाषण आहे.
काम बंद करा, नाहीतर…
या संभाषणात, वाल्मिक कराड पवनचक्की प्रकल्पाचे काम बंद करण्याचे फर्मान सोडतो. “काम आहे त्या परिस्थितीत बंद करा,” असा दम वाल्मिक कराड पवनचक्की कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे (Sunil Shinde) यांना भरतो. 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली. “निवडणुका झाल्या, मी आता मोकळा झालोय,” असे वाल्मिक या संभाषणात म्हणतो. हा संभाषणाचा तपशील पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केला आहे.
ऑडिओ क्लिप मधील संवाद
या संभाषणात विष्णू चाटे (Vishnu Chate) देखील सहभागी आहे. संभाषणाची सुरुवात सुनील शिंदे यांच्या “नमस्कार विष्णू भाऊ” या वाक्याने होते. विष्णू चाटे “आण्णा बोलतील” असे सांगून फोन वाल्मिक कराडला देतो. त्यानंतर वाल्मिक कराड अत्यंत कठोर शब्दांत सुनील शिंदे यांना धमक्या देतो.
“चालू केलं तर वातावरण गढूळ होईल,” “ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं, त्याच परिस्थितीत बंद करा,” अशा धमक्या तो देतो. इतकेच नाही तर अर्वाच्य भाषेत शिवीगाळही करतो. “काम चालू झालं तर याद राखा,” अशी धमकीही तो देतो.
सीआयडी पोलिसांच्या दोषारोपपत्रात तब्बल 1000 पानांची माहिती देण्यात आली असून संबंधित घटनेचा थरारक घटनाक्रम देखील यातून उलगडला आहे. संतोष देशमुख यांच्या अंगावरील कपडे काढून, त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. आता, सीआयडीच्या चार्जशीटमधून या घटनेचे फोटो समोर आले आहेत.






