Union Budget 2026 | देशाच्या आर्थिक भवितव्याची दिशा ठरवणारा केंद्रीय अर्थसंकल्प 2026 आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. येत्या रविवारी, 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प असणार असून, सलग नवव्यांदा बजेट सादर करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर होणार आहे. (Union Budget 2026)
काल संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष बजेटमधील नव्या घोषणा, करसवलती, महागाईवर उपाय, तसेच घरगुती बजेटला दिलासा मिळणार का याकडे लागले आहे. उद्योग, शेती, रोजगार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांसाठी कोणत्या मोठ्या घोषणा होतील, याची देशभर उत्सुकता आहे.
पहिल्यांदाच रविवारी सादर होणार बजेट :
भारतीय इतिहासात प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर होणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत आपलं बजेट भाषण सुरू करतील. 2017 पूर्वी बजेट फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केलं जात असे, मात्र माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही परंपरा बदलून 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर करण्याचा निर्णय घेतला होता. (Union Budget 2026)
या अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्ग, शेतकरी, महिला, युवक आणि उद्योजक वर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत. विशेषतः आयकर स्लॅबमध्ये बदल, घरकर्जावरील सवलती, महागाई नियंत्रणासाठी उपाययोजना आणि पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक यावर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Union Budget 2026 | बजेट LIVE कुठे पाहणार? कॉपी कुठून डाउनलोड करणार? :
बजेटचं थेट प्रक्षेपण तुम्ही घरबसल्या टीव्हीवर तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. तसेच अर्थमंत्र्यांचं भाषण पूर्ण झाल्यानंतर बजेटची संपूर्ण प्रत सरकारकडून डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल. (Budget live streaming)
याशिवाय तुम्ही indiabudget.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून किंवा ‘Union Budget Mobile App’ वरून बजेटचे सर्व दस्तऐवज पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता.






