FSSAI | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनी काही लोकप्रिय रम आणि व्हिस्की उत्पादनांवर कारवाई केल्यानंतर मद्य उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे. ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्स, बॅगपाइपर, रॉयल चॅलेंज आणि अँटीक्विटी ब्ल्यू या प्रसिद्ध ब्रँड्सच्या काही विशिष्ट उत्पादनांवर नियमभंगाच्या आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, ही बंदी सर्व उत्पादनांवर लागू आहे की काही विशिष्ट उत्पादन केंद्रांपुरती मर्यादित आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
कोणत्या कारणांमुळे झाली कारवाई? :
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांच्या तपासात काही उत्पादकांनी रम आणि व्हिस्कीला नैसर्गिकरित्या परिपक्व (Aged) झाल्यासारखा स्वाद आणि सुगंध देण्यासाठी कृत्रिम किंवा “नेचर आयडेंटिकल” (Nature Identical) फ्लेवरिंगचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नियमानुसार रम, व्हिस्की, ब्रँडी आणि जिन यांसारख्या मद्यांमध्ये त्यांचा नैसर्गिक स्वाद आणि सुगंध हा मूळ उत्पादन प्रक्रिया आणि घटकांमधून निर्माण होणे अपेक्षित असते. त्यामुळे कृत्रिम फ्लेवरचा वापर नियमांच्या विरोधात असल्याचे प्राधिकरणाचे मत आहे.
या कारवाईत ओल्ड मॉन्कच्या काही व्हेरियंट्स, मॅकडॉवेल्स नंबर 1 रम, बॅगपाइपर डिलक्स व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की आणि अँटीक्विटी ब्ल्यू व्हिस्की या उत्पादनांचा समावेश आहे. मात्र, संबंधित ब्रँड्सच्या सर्व बाटल्यांवर किंवा सर्व राज्यांतील उत्पादनांवर ही कारवाई लागू आहे की केवळ काही उत्पादन केंद्रांतील उत्पादनांपुरतीच मर्यादित आहे, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता देण्यात आलेली नाही.
FSSAI | नियमभंगाबाबत सहा मुद्द्यांवर आक्षेप :
प्राधिकरणाच्या निरीक्षणानुसार संबंधित उत्पादने केवळ दर्जाबाबतच नव्हे, तर ग्राहकांची दिशाभूल करणारी असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. रम किंवा व्हिस्की मूळ कच्च्या पदार्थांपासून तयार करण्याऐवजी कृत्रिम फ्लेवरचा वापर केल्यामुळे त्यांचा नैसर्गिक स्वाद आणि सुगंध बदलल्याचा दावा करण्यात आला आहे. रमसाठी मोलॅसिस (Molasses) आणि व्हिस्कीसाठी माल्ट (Malt) वापरण्याऐवजी फ्लेवर मिसळल्याने उत्पादनाची मूळ वैशिष्ट्ये हरवली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
तसेच उत्पादन नेमके कोणत्या घटकांपासून तयार केले आहे, याची माहिती लेबलवर स्पष्टपणे नमूद नसल्याचा आक्षेपही घेण्यात आला आहे. अशा उत्पादनांची विक्री “रम फ्लेवर्ड स्पिरिट” किंवा “व्हिस्की फ्लेवर्ड स्पिरिट” या स्वरूपात केली जाणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित कंपन्यांनी आपण सर्व नियमांचे पालन केल्याचा दावा केला आहे. काही कंपन्यांनी या कारवाईला न्यायालयात आव्हान दिले असून हा वाद उत्पादनाच्या सुरक्षिततेशी संबंधित नसून नियमांच्या व्याख्येवर आधारित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अंतिम न्यायालयीन किंवा नियामक निर्णय येईपर्यंत काही ठिकाणी संबंधित उत्पादनांची विक्री तात्पुरती थांबवली जाऊ शकते.






