Uddhav Thackeray | नागपूर (Nagpur) येथे दाखल होताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) अत्यंत आक्रमक शब्दांत प्रहार केला आहे. नागपुरात शिवसैनिकांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडलेल्या ‘रामरक्षा’ कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना थेट सवाल करत भाजपच्या हिंदुत्वावर जोरदार निशाणा साधला.
तुम्ही रामरक्षकांच्या बाजूने की मंदिर लुटारूंच्या? फडणवीसांना सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना रामरक्षा म्हणून दाखवण्याचे खुले आव्हान दिले होते. या आव्हानाचा जाहीर समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, “संजय राऊत मला विचारत होते की भाषणात समोर टेलिप्रॉम्प्टर ठेवायचा का? मी म्हटलं कशाला? फडणवीस यांनी मला रामरक्षा म्हणण्याचं चॅलेंज दिलं होतं. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, रामरक्षा नुसती तोंडपाठ म्हणून दाखवणं हे तुमचं काम असलं, तरी प्रभू रामाची आणि मंदिरांची ‘रक्षा’ (रक्षण) करण्याचं काम आमचं आहे. आम्ही खरे रामरक्षक आहोत. ‘मनी नाही भाव आणि देवा मला पाव’ असं आमचं बेगडी हिंदुत्व नाही.”
फडणवीसांवर सडकून टोला लगावत ते पुढे म्हणाले, “वर्गाच्या मॉनिटरसारखं आम्हाला सांगू नका की रामरक्षा पाठ आहे की नाही. आज रामाची आणि मंदिरांची रक्षा करण्यासाठी खऱ्या रामभक्तांना रस्त्यावर समोर यावं लागतं आहे, यापेक्षा दुर्दैव ते काय? फडणवीस यांनी आमची चेष्टा आणि टिंगलटवाळी करणे आधी बंद करावे. त्यांनी आधी हे स्पष्ट करावे की ते रामरक्षा करणाऱ्यांच्या बाजूने आहेत की मंदिर लुटणाऱ्यांच्या बाजूने आहेत?”
“भाजप सरकारच्या अंगात सैतान भरलाय का?” सोनम वांगचुक यांच्या अटकेवरून टीका
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणातील आंदोलनाचाही तीव्रतेने उल्लेख केला. ते म्हणाले, “आज पहिली धक्कादायक बातमी दिल्लीतून आली. तिथे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शांततेत उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या आंदोलनात पोलीस जबरदस्तीने घुसले आणि वांगचुक यांना उचलून घेऊन गेले. मी प्रभू रामचंद्रांना विचारतोय की, रामाचं नाव समोर करून हे भाजप सरकार सत्तेत आलं, पण सध्या यांच्या अंगामध्ये सैतान आला आहे का? हे सरकार इतकं माजल्यासारखं का वागत आहे?”
मोहन भागवतांना थेट प्रश्न: “हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं का?”
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना जाहीर आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी देशातील आणि राज्यातील सद्यस्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले, “भागवत साहेब, ज्या पद्धतीने सध्याचे भाजप सरकार वागत आहे, ते पाहता हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं का? आज महाराष्ट्रात आणि देशात मंदिरे लुटली जात आहेत, मंदिरातून तिजोऱ्या फोडल्या जात आहेत, विद्यार्थ्यांचे पेपर फुटत आहेत आणि राजकीय पक्ष फोडले जात आहेत. आमचे हिंदुत्व हे नाही, आम्हाला कंत्राटदारांना (Contractors) अभय देणारे हिंदू राष्ट्र नको, तर आम्हाला ‘रामराज्य’ हवे आहे.”
मोहन भागवतांच्या लोकसंख्याविषयक जुन्या विधानाचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, “भागवत साहेब, तुम्ही म्हणाला होता की या देशातील मुस्लिम हे देखील हिंदूच आहेत, त्यामुळे हिंदूंनी आपली संख्या वाढवण्यासाठी २ ते ३ अपत्ये जन्माला घातली पाहिजेत. मग आज ज्या माता-भगिनींनी ही अपत्ये जन्माला घातली आणि पुढे जाऊन स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटले, त्या तरुणांचं काय करणार? आणखी अपत्ये जन्माला घालून त्यांना या भ्रष्ट व्यवस्थेत चिरडणार का? असं हिंदू राष्ट्र आम्हाला मान्य नाही.”
बाबरीच्या आंदोलनाचा इतिहास आणि बाळासाहेबांची आठवण
आपल्या भाषणाचा शेवट करताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जुन्या ज्वलंत हिंदुत्वाची आठवण करून दिली. “जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली, तेव्हा भाजपचे मोठे नेते घाबरून पळून गेले होते. त्या कठीण काळात केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हेच एकमेव नेते होते, ज्यांनी छातीठोकपणे सांगितले होते की, ‘जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल, तर मला त्याचा अभिमान आहे – गर्व से कहो हम हिंदू है!’ त्या काळी या आंदोलनासाठी लाखो शिवसैनिकांनी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, कित्येक जण तुरुंगात गेले. बाळासाहेबांनी एवढा मोठा धोका पत्करून उभे केलेले हे आंदोलन होते. पण आज प्रश्न पडतो की, ‘मंदिर वही बनायेंगे’ची घोषणा तुम्ही नक्की कशासाठी दिली होती? मंदिरे लुटण्यासाठी की कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी? आम्ही या मंदिर लुटारूंच्या विरोधात शेवटपर्यंत लढत राहू,” असा वज्रनिर्धार त्यांनी व्यक्त केला.
News Title: Uddhav Thackeray questioned Devendra Fadnavis on Ram Raksha BJP Nagpur






