Ketan Agrawal Case | पुण्यातील लोहगड (Lohagad Fort) येथे घडलेल्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाला 18 जुलै रोजी एक महिना पूर्ण झाला. या पार्श्वभूमीवर अग्रवाल कुटुंबीयांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Shrimant Dagdusheth Halwai Ganpati) मंदिरात जाऊन दर्शन घेत न्यायासाठी प्रार्थना केली. यावेळी केतनची बहीण संजना अग्रवाल (Sanjana Agrawal) प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर आली आणि भावाच्या हत्येनंतर कुटुंबावर आलेल्या दुःखाबद्दल भावनिक शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.
सुरुवातीपासूनच व्यक्त केला होता संशय :
लोहगड किल्ल्यावरून दरीत पडल्याने केतनचा मृत्यू झाला, असा सुरुवातीला अपघाताचा आभास निर्माण करण्यात आला होता. मात्र ही घटना नैसर्गिक नसून त्यामागे घातपात असल्याचा संशय सर्वप्रथम केतनची बहीण संजना यांनी व्यक्त केला होता. तिने केतनची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhari) यांच्यावर सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला होता.
संजना यांनी व्यक्त केलेल्या संशयामुळेच पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. त्यानंतर झालेल्या सखोल चौकशीत अपघाताचा बनाव उघडकीस आला आणि हे हत्या प्रकरण असल्याचे स्पष्ट झाले. पुढे पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेत तपासाची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू केली.
Ketan Agrawal Case | भावाच्या आठवणींनी कुटुंब व्यथित :
दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना संजना अत्यंत भावूक झाल्या. त्यांनी सांगितले की, भावाच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला असून या काळात त्याचा चेहरा पाहता आला नाही किंवा त्याचा आवाज ऐकता आला नाही. त्यातच हा दिवस त्यांच्या आजोबा देवीचंद अग्रवाल (Devichand Agrawal) यांच्या वाढदिवसाचाही होता. मात्र केतनच्या हत्येचा धक्का सहन न झाल्याने काही दिवसांपूर्वी आजोबांचेही निधन झाले. त्यामुळे घरात आनंदाऐवजी केवळ वेदना आणि केतनच्या आठवणीच उरल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
संजना यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या कुटुंबाने दुःखाची परिसीमा गाठली असून आता न्यायव्यवस्थेवरच त्यांचा पूर्ण विश्वास आहे. कायदेशीर प्रक्रियेद्वारे या प्रकरणाचा निष्पक्ष आणि लवकर निकाल लागावा, तसेच केतनला न्याय मिळावा, अशीच प्रार्थना त्यांनी बाप्पाकडे केली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी हे परस्परांशी सांकेतिक भाषेत संवाद साधत असल्याची माहिती समोर आली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी हटवण्यात आलेले व्हॉट्सॲप संदेश पुन्हा मिळवण्यासाठी पोलीस सायबर तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेत असून तपासातून आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






