रवींद्र धंगेकरांना अटक होणार? पत्नीसह नॉट रिचेबल; पोलिसांकडून शोध सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

On: July 19, 2026 1:19 PM
Ravindra Dhangekar
---Advertisement---

Ravindra Dhangekar | पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख (Khalil Sheikh) यांच्या मृत्यूप्रकरणात माजी आमदार तथा शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात त्यांच्यासह पत्नी प्रतिभा धंगेकर (Pratibha Dhangekar) आणि इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटकेची शक्यता निर्माण झाल्याने दोघेही सध्या संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना केली आहेत.

अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव :

खलील शेख यांच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर, प्रतिभा धंगेकर आणि अन्य व्यक्तींवर करण्यात आला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर कारवाईची शक्यता वाढली आहे. अटक टाळण्यासाठी धंगेकर दाम्पत्याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, पोलिस कारवाईपूर्वी दोघांनीही आपले मोबाईल फोन बंद ठेवले असून ते नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पुणे पोलिसांची अनेक पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. अटकपूर्व जामिनावर निर्णय होण्यापूर्वी पोलिसांच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी त्यांनी अज्ञातस्थळी मुक्काम केल्याची माहिती समोर येत आहे.

Ravindra Dhangekar | व्हिडिओ, सुसाईड नोट आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी

मृत्यूपूर्वी खलील शेख यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या मृत्यूस कोण जबाबदार असल्याचा उल्लेख केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी रवींद्र धंगेकर, प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे (Bala Shedge), त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे (Varsha Shedge) तसेच इतर काही व्यक्तींची नावे घेतली होती. त्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात धंगेकर यांच्यासह एकूण 14 जणांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला.

खलील शेख यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, व्यवसायातील इतर भागीदार केवळ नावापुरते होते, तर आर्थिक व्यवहारांचे नियंत्रण रवींद्र धंगेकर यांच्याकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. तपासादरम्यान प्रत्येक व्यक्तीचा सहभाग, आर्थिक देवाणघेवाण आणि थकीत व्यवहारांची पडताळणी केली जाणार आहे. तसेच धंगेकर हे स्वतःच्या पैशांच्या वसुलीसाठी एका विशिष्ट व्यक्तीकडे वारंवार जात असल्याची माहितीही समोर आली आहे. मृताने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सुमारे अडीच कोटी रुपयांची वसुली बाकी असल्याचा उल्लेख असल्याने या आर्थिक व्यवहारांचाही तपास केला जाणार असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती स्वारगेट पोलिसांनी दिली आहे.

News Title: Ravindra Dhangekar Faces Arrest in Khalil Sheikh Case

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now