“कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही”; उद्धव ठाकरेंचा संभाजी भिडेंना टोला

On: March 27, 2025 3:27 PM
Uddhav Thackeray on Sambhaji Bhide
---Advertisement---

Uddhav Thackeray | वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सुरू झालेला वाद आता राजकीय रंग घेत आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यावर टीका करत वाघ्या कुत्र्याचे स्मारक रायगडवरच हवे, असा आग्रह धरला होता. यावर आता शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी भिडेंच्या वादग्रस्त ‘आंबा’ वक्तव्याचा संदर्भ देत टीकेची झोड उठवली.

“कोणत्या बागेचा आंबा खाल्ला?”

एका पत्रकार परिषदेत संभाजी भिडे यांच्याबद्दल विचारण्यात आले असता उद्धव ठाकरे म्हणाले, “ते कोणत्या बागेचा आंबा खाल्ला, हेच माहीत नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलण्याची गरज नाही.” या विधानावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

उद्धव ठाकरे यांचा हा टोला भिडे यांच्या काही वर्षांपूर्वीच्या वादग्रस्त विधानावर आधारित होता, ज्यामध्ये त्यांनी असा दावा केला होता की त्यांच्या शेतातील एका विशिष्ट आंब्याचं फळ खाल्ल्यास अपत्यप्राप्ती होते. या विधानामुळे ते मोठ्या वादात अडकले होते.

वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून राजकीय संघर्ष

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी ऐतिहासिक पुराव्याविना हटवण्याची मागणी केली होती. या मागणीला भिडेंनी विरोध करत म्हटलं की, “वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे. ते स्मारक तिथेच राहिलं पाहिजे. माणसं एकनिष्ठ नसतात, कुत्री तरी असतात.”

भिडेंनी पुढे शिवाजी महाराजांबाबत आपली हिंदुत्ववादी भूमिका पुन्हा अधोरेखित केली. ते म्हणाले, “महाराज हे सर्वधर्म समभावी नव्हते, ते हिंदू स्वराज्य स्थापनेच्या विचाराने प्रेरित होते,” अशी पुस्तकी उदाहरणं देत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

संभाजी भिडे यांनी यापूर्वी असा दावा केला होता की, “माझ्या बागेतलं एक खास आंब्याचं झाड आहे, ज्याचं फळ खाल्ल्यास अपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जोडप्यांनी ते फळ खाल्लं असून, त्यातील 150 जणांना अपत्यप्राप्ती झाली आहे. हे आंबं वंध्यत्वावरचा उपाय आहे,” असा अजब दावा त्यांनी केला होता.

  Title : Uddhav Thackeray on Sambhaji Bhide

 

Join WhatsApp Group

Join Now