Trimbakeshwar Temple | श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 13 ऑगस्टपासून 13 सप्टेंबरपर्यंत मंदिरातील VIP दर्शनाची सुविधा बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसह प्रत्येक भाविकाला एकाच रांगेतून त्र्यंबकराजाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.
गर्दी आणि सुरक्षेमुळे VIP दर्शनाला स्थगिती :
नाशिकमधील श्री त्र्यंबकेश्वर मंदिर हे देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. श्रावण महिन्यात येथे दर्शनासाठी देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक येतात. याच पार्श्वभूमीवर 13 ऑगस्ट 2026 पासून VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही व्यवस्था तब्बल महिनाभर लागू राहणार असून 13 सप्टेंबरपर्यंत भाविकांना स्वतंत्र VIP रांगेऐवजी सर्वसामान्यांसोबत एकाच रांगेतून दर्शन घ्यावे लागेल.
मंदिरात गर्दी वाढल्यानंतर सामान्य भाविकांना बराच काळ रांगेत थांबावे लागते. त्यात VIP दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था असल्यास गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेची जबाबदारी आणखी वाढते. त्यामुळे प्रत्येक भाविकाला अधिक सुलभ आणि सुरक्षित पद्धतीने दर्शन घेता यावे, या उद्देशाने ट्रस्टने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. आता 13 सप्टेंबरपर्यंत कोणासाठीही स्वतंत्र VIP दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. या निर्णयामुळे दर्शनासाठी लागणाऱ्या रांगेचे नियोजन अधिक व्यवस्थित होण्याची अपेक्षा आहे.
Trimbakeshwar Temple | श्रावणानंतर गणेशोत्सवाचीही गर्दी :
महाराष्ट्रात पंचांगानुसार श्रावण महिना देशातील अनेक अन्य राज्यांच्या तुलनेत सुमारे 15 दिवस उशिरा सुरू होतो. यंदा महाराष्ट्रातील श्रावण महिन्याची सांगता 13 सप्टेंबरला होणार आहे. विशेष म्हणजे त्यानंतर लगेचच 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) उत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे श्रावण आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. संभाव्य गर्दीचा विचार करूनच दर्शन व्यवस्थेबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.
VIP संस्कृतीऐवजी सर्वांसाठी समान दर्शनाची व्यवस्था लागू झाल्याने सामान्य भाविकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. सर्वजण एकाच रांगेतून पुढे गेल्यामुळे दर्शनाची रांग अधिक वेगाने सरकण्यास मदत होईल आणि दीर्घकाळ प्रतीक्षा करण्याचा त्रास कमी होईल, अशी भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, वाढणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून अतिरिक्त सुरक्षा रक्षक आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि शिस्तीने त्र्यंबकराजाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे.






