MHADA | ठाण्यात स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. चितळसर मानपाडा येथील म्हाडाच्या (MHADA) गृहप्रकल्पातील सदनिकांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत आदेश देण्यात आले. त्यामुळे 51 ते 52 लाखांपर्यंत गेलेल्या घरांची किंमत आता सुमारे 44 ते 46 लाख रुपये होणार आहे.
चितळसर मानपाडा प्रकल्पात दरांवरून निर्माण झाला होता पेच :
चितळसर मानपाडा येथील या गृहप्रकल्पातील काही इमारतींना 2020-21 मध्येच अंशतः भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच ओसी (OC) मिळाले होते. त्या कालावधीत घरांसाठी प्रति चौरस फूट 10 हजार रुपये असा दर निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित सदनिकांची किंमत साधारण 44 लाख रुपयांच्या आसपास होती. मात्र, प्रकल्पातील उर्वरित घरांना पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यासाठी 2025-26 पर्यंतचा कालावधी लागला.
पूर्ण ओसी मिळाल्यानंतर लागू असलेल्या प्रशासकीय नियमानुसार पुढील वर्षांचा सुधारित रेडी रेकनर दर विचारात घेण्यात आला. परिणामी, त्याच प्रकल्पातील उर्वरित घरांच्या किमती 51 ते 52 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्या. विशेष म्हणजे, एकाच इमारतीत आणि समान क्षेत्रफळाच्या सदनिकांसाठी वेगवेगळे दर लागू झाले. या दरातील तफावतीमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि वाढलेल्या किमतीचा आर्थिक भारही त्यांच्यावर पडत होता. यासंदर्भात म्हाडाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.
MHADA | एकनाथ शिंदेंच्या बैठकीनंतर घरांचे दर घटले
नागरिकांच्या तक्रारी आणि वाढलेल्या घरांच्या किमतीची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या (MHADA) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या चर्चेला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड, अन्य वरिष्ठ अधिकारी तसेच तक्रारदार नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत समान इमारतीतील आणि समान क्षेत्रफळाच्या घरांना वेगवेगळे दर आकारणे योग्य नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला.
यानंतर संपूर्ण प्रकल्पासाठी 2020-21 चाच रेडी रेकनर दर ग्राह्य धरावा, असे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. या निर्णयामुळे घरांचे दर पुन्हा 44 ते 46 लाख रुपयांच्या पातळीवर येणार आहेत. दरम्यान, 14 जुलै 2025 रोजी झालेल्या म्हाडाच्या लॉटरीतील 434 विजेत्यांनी स्वीकृती पत्रे जमा करून आपले पात्रत्व निश्चित केले आहे. या सर्व 434 लाभार्थ्यांना नव्या निर्णयाचा लाभ कायम ठेवण्यात आला आहे. आता उर्वरित उपलब्ध सदनिकांसाठी कमी केलेल्या दरांवर नव्याने लॉटरी काढली जाणार आहे. त्यामुळे ठाण्यात घर घेण्याची इच्छा असलेल्या नागरिकांना या निर्णयामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.






