Scam l मुंबईत (Mumbai) एक धक्कादायक घोटाळा (Scam) उघडकीस आला आहे. आयएक्स ग्लोबल (IX Global) नावाच्या कंपनीने फॉरेक्स ट्रेडिंगच्या (Forex Trading) नावाखाली हजारो कोटी रुपयांची फसवणूक केली असून, या घोटाळ्याची व्याप्ती 10 हजार कोटींपर्यंत (10 Thousand Crores) जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा घोटाळा पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरू होता आणि तक्रार दाखल होऊनही तब्बल साडेतीन वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
2021 मध्ये मुंबईतील एका तरुणाने आर्थिक गुन्हे शाखेकडे (Economic Offences Wing) 36 हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. मात्र, “दहा कोटींपर्यंत फसवणूक झालेले गुंतवणूकदार असतील तर आमच्याकडे या,” असे सांगत गुन्हे शाखेने त्याला परत पाठवले. फसवणूक झालेले 212 गुंतवणूकदार एकत्र आले आणि त्यांनी 30 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हे शाखेत तक्रार केली, तेव्हा कुठे गुन्हा नोंदवून घेण्यात आला.
कशी व्हायची फसवणूक?
-फॉरेक्स ट्रेडिंग, शेअर (Share), क्रिप्टो मार्केटमध्ये (Crypto Market) गुंतवणूक (Investment) केल्यास 5 ते 25% नफ्याचे आमिष दाखवले जायचे.
-बायनरी (Binary), फॉरेक्स, स्पोर्ट क्रिप्टो मार्केटमध्ये ऑनलाइन ट्रेडिंग (Online Trading) व खरेदी-विक्री करून पैसे कसे कमवायचे, याच्या टिप्स दिल्या जायच्या.
-महिन्याला 124.99 डॉलर बेसिक प्लान (Basic Plan) व 144.99 डॉलर प्रो-प्लान (Pro-Plan) अशी रक्कम आकारली जायची.
-ऑटोमेशन ट्रेडिंगमध्ये (Automation Trading) 100 डॉलरपेक्षा अधिक पैसे घेऊन महिन्याला 5 ते 15% किंवा 8 ते 9 महिन्यात दुप्पट पैशांचे आमिष दाखवले जायचे.
-द डेटबॉक्स (The Datebox), क्रिप्टोलँडसह (Cryptoland) विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले जायचे.
-डायरेक्ट सेलिंग (Direct Selling) किंवा मल्टी लेव्हल मार्केटिंग प्लॅनमध्ये (Multi Level Marketing Plan) 3 नवीन सदस्यांना आयएक्स ग्लोबलमध्ये प्रवेश दिल्यास 11 वेगवेगळ्या लेव्हलनुसार 100 डॉलर ते 1 लाख डॉलरपेक्षा जास्त रक्कम प्रति महिना मिळकतीचे आश्वासन दिले जात होते.
मुख्य सूत्रधार परदेशात फरार:
ईडीने (ED) विराज पाटील आणि प्रसेनजीत दासला अटक केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्यांचा ताबा घेतला. तेव्हा, पाटीलने यामागील मुख्य सूत्रधार तुषार पटेल (Tushar Patel) असल्याचे सांगितले. दहावी पास असलेला पटेल हा दुबईत (Dubai) राहतो.
कंपनीची नोंदणी आणि पत्ता:
13 जानेवारी 2020 मध्ये विराजच्या दहिसर (Dahisar) येथील राहत्या घराच्या पत्त्यावर ही कंपनी नोंदवण्यात आली आहे. तर, अमेरिकेत (America) उटा (Utah) येथे त्यांचे कार्यालय असल्याचा दावा करण्यात आला होता.
आतापर्यंत 500 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवले असून, फसवणुकीचा आकडा 69 कोटींवर गेला आहे. आयएक्स ग्लोबल एलएलसी, आयएक्स. ग्लोबल अॅकॅडमी प्रा.लि., टी.पी. ग्लोबल एफ. एक्स., पोचेन ग्लोबल या कंपन्यांसह कंपन्याचे संचालक जोसेफ मार्टिनेज, विराज पाटील, सॅव्हिओ परेरा, रमेश चौधरी, हर्ष बंसल, नयना भाटी, मंगेश शिंदेसह 25 जण आणि अन्य दलालांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ईडीने एका प्रकरणात संचालक विराज पाटील व प्रसेनजीत दास यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यानंतर गुन्हे शाखेनेही त्यांना अटक केली. सॅव्हिओ पेरेरा, मंगेश शिंदे, जोसेफ मार्टिनेजविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने एलओसी (LOC) जारी केली. मार्टिनेजविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही (Red Corner Notice) जारी होणार आहे. ईओडब्ल्यूच्या (EOW) विरोधामुळे आरोपी नयना भाटी व अजित डोके यांचा अटकपूर्व जामीनही फेटाळण्यात आला आहे.






