Yuzvendra Chahal | भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि डान्सर-इन्फ्लुएंसर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा २० मार्च रोजी अधिकृतरीत्या घटस्फोट झाला. सुरुवातीला दोघांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. मात्र आता एका नव्या रिपोर्टनुसार, त्यांच्या नात्याच्या संपुष्टात येण्यामागचं खऱं कारण समोर आलं आहे.
रहायची जागा ठरली नात्यातील वितुष्टाचं कारण
समोर आलेल्या माहितीनूसार, चहल आणि धनश्री यांच्या नात्यात वादाचं मूळ कारण म्हणजे राहण्याचं ठिकाण. डिसेंबर 2020 मध्ये दोघांनी लग्न केलं. त्यानंतर धनश्री चहलच्या हरियाणामधील घरी, त्यांच्या आई-वडिलांसोबत राहायला गेली. काही काळाने मात्र तिने मुंबईत स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली, जी गोष्ट चहलला मान्य नव्हती.
धनश्रीची इच्छा होती की, चहल आणि ती दोघं मुंबईत राहावं, कारण तिचं काम आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या मुंबईशी निगडित होत्या. मात्र चहल आपल्या पालकांपासून वेगळं राहण्यास तयार नव्हता. त्याला आपल्या कुटुंबासोबत हरियाणातीलच घरी राहणं पसंत होतं. या मतभेदांमुळेच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि शेवटी घटस्फोटापर्यंत गोष्टी पोहोचल्या.
घटस्फोटासाठी चहलने दिले ४.७५ कोटी रुपये – रिपोर्ट
या नात्याच्या शेवटी, IPL 2025 सुरू होण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी, 20 मार्च रोजी मुंबईच्या (Mumbai) बांद्रा येथील फॅमिली कोर्टात दोघांचा घटस्फोट पार पडला. रिपोर्टनुसार, या प्रक्रियेत युजवेंद्र चहलने धनश्रीला ₹4.75 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं, यातील ₹2.37 कोटी रुपये आधीच देण्यात आले आहेत, तर उरलेली रक्कम लवकरच दिली जाणार आहे.
याबाबत चहल किंवा धनश्री, तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांच्या घटस्फोटाच्या जाहीर निवेदनात केवळ “परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे” असं नमूद करण्यात आलं होतं.






