Tahawwur Rana | 26/11 मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याला अखेर भारतात आणण्यात आले आहे. आज (10 एप्रिल) सकाळी त्याला घेऊन आलेलं खास विमान दिल्लीतील पालम विमानतळावर उतरलं. त्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात प्रचंड कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राणाकडे आहे ‘या’ देशाचे नागरिकत्व
राणा हा मूळचा पाकिस्तानचा असून, त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे. तो लष्कर-ए-तैयब्बा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. 26/11 च्या भीषण हल्ल्यात त्याने अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडलीला सहाय्य केले होते. हेडलीने हल्ल्यापूर्वी मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती, आणि राणाची त्यात महत्त्वपूर्ण भूमिका होती.
FBI ने 2009 मध्ये शिकागो येथून राणाला अटक केली होती. हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचे पुरावे मिळाल्यामुळे त्याच्यावर खटला सुरु झाला. त्यानंतर त्याने अमेरिकेतील अनेक न्यायालयात आपले प्रत्यार्पण थांबविण्याचे प्रयत्न केले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याचे सर्व युक्तिवाद फेटाळले आणि भारतात प्रत्यार्पणासाठी मार्ग मोकळा झाला. त्याने पाकिस्तान सरकारकडे 26/11 च्या हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांना सन्मान देण्याची मागणी केल्याचेही समोर आले होते.
ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील दौऱ्यादरम्यान, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राणाला भारतात सोपविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि गृहमंत्रालयाने संयुक्तपणे यावर काम सुरू केले.
26/11 हल्ल्यात 166 बळी
2008 साली झालेल्या या भयंकर हल्ल्यात 166 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सहा अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता. या हल्ल्यानंतर भारताच्या दहशतवादविरोधी धोरणात मोठा बदल झाला आणि जगभरातून या घटनेची निंदा झाली.






