Swargate Rape Case | पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीने राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून पोलिसांकडून आणि वैद्यकीय तपासणीदरम्यान मिळालेल्या वागणुकीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तिसऱ्यांदा बलात्काराचा आरोप-
पुणे शहरातील (Pune) स्वारगेट येथील शिवशाही बस डेपोमध्ये 26 फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेत आरोपी दत्तात्रय गाडेने (Dattatray Gade) तरुणीवर बसमध्ये बलात्कार केला होता. ही तरुणी फलटणच्या दिशेने (Swargate Rape Case) प्रवास करत असताना बंद अवस्थेतील शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तब्बल 75 तासांनी पोलिसांनी आरोपीला गुनाट गावातून अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.
या प्रकरणात आता पीडित तरुणीने राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून आरोपीने तिसऱ्यांदा बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तिच्य (Swargate Rape Case) म्हणण्यानुसार, दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिसऱ्यांदा पार्श्वभागाकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र, त्या वेळी तिने जोरदार विरोध केला आणि त्यामुळे आरोपी पळून गेला. घटनेदरम्यान आरडाओरड केल्यामुळे तिचा आवाज घशातच बसला होता आणि अनेक बलात्कार पीडित मुलींचे हत्येचे प्रसंग आठवले, ज्यामुळे ती जिव वाचवण्यासाठी शांत राहिली, असे तिने नमूद केले.
पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आरोप-
पीडित तरुणीने आपल्या पत्रात पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची परवानगी न घेता वैद्यकीय तपासणी केली. तसेच, तिला तिच्या पसंतीचे वकील मिळावा, यासाठी असीम सरोदे यांची नेमणूक करण्याची विनंती केली होती. पण पोलिसांनी तिला “एक दिवस उशीर झाला” असे सांगून दुसऱ्याच वकिलाची नियुक्ती केली.
पत्रात तिने आणखी एका वकिलाच्या – अजय मिसार यांच्या बद्दल शंका उपस्थित केली असून, “मी माहितीशास्त्र अभ्यासले असल्यामुळे मी काही गोष्टी ओळखू शकते,” असे नमूद केले आहे. तिच्यावर कसा अत्याचार झाला, हे तिला अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना वारंवार सांगावे लागले, याबद्दलही तिने नाराजी व्यक्त केली आहे.






