Gold Price | सोनं-चांदीच्या किमती सध्या सामान्यांच्या खिशाला मोठा फटका देताना दिसत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदीने इतिहास रचत थेट 3 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर सोन्याचे दरही नवनवे उच्चांक गाठत असून दागिन्यांच्या खरेदीसाठी सामान्य नागरिकांना मोठा खर्च करावा लागत आहे. लग्नसराई, सणासुदी आणि गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दर लोकांसाठी अधिकच धक्कादायक ठरत आहेत. (Today Gold Price)
सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. एका किलो चांदीचा दर 3 लाख 1 हजार 315 रुपयांवर पोहोचला असून इतिहासात पहिल्यांदाच हा आकडा गाठण्यात आला आहे. अवघ्या काही आठवड्यांत चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली असून गुंतवणूकदारांसह सामान्य ग्राहकही या दरवाढीमुळे चिंतेत आहेत. (Silver Price 3 Lakh)
चांदीने मोडले सर्व विक्रम :
या महिन्यातच चांदीच्या दरात तब्बल 65 हजार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. डिसेंबर अखेरीस 2 लाख 35 हजार रुपयांवर असलेली चांदी आता थेट 3 लाखांपार पोहोचली आहे. जागतिक घडामोडी, बाजारातील अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून चांदीकडे वाढलेला कल यामुळे ही दरवाढ झाल्याचे मानले जात आहे. सराफ बाजारातही या वाढीचा थेट परिणाम जाणवत असून दागिन्यांच्या खरेदीवर मर्यादा येत आहेत. (Silver Price 3 Lakh)
विशेष म्हणजे ग्रामीण भागात लग्नसमारंभासाठी चांदीच्या दागिन्यांना मोठी मागणी असते. मात्र, सध्याचे दर पाहता अनेक कुटुंबांसाठी ही खरेदी मोठी डोकेदुखी ठरत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, दर वाढल्यामुळे व्यवहारांमध्ये काही प्रमाणात मंदी येण्याची शक्यता आहे.
Gold Price | सोन्याचाही दर नवा उच्चांकावर :
चांदीप्रमाणेच सोन्याच्याही दरात मोठी वाढ झाली आहे. MCX वर सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 45 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सोन्याच्या दरात सुमारे 9 हजार 700 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा आर्थिक भार निर्माण झाला आहे.
जळगावसारख्या सराफ बाजारांमध्ये सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 48 हजार रुपयांवर पोहोचले असून चांदीचे दर 3 लाख 3 हजार 850 रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे “पोरांची लग्न कशी करायची?” असा सवाल सामान्य कुटुंबांमधून विचारला जात आहे. (Today Gold Price)
जागतिक तणाव, व्यापार शुल्कांमुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणुकीचा शोध यामुळे सोने-चांदीच्या दरात ही मोठी उसळी आली आहे. गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून पुन्हा एकदा मौल्यवान धातूंकडे वळत असल्याने दरवाढीचा वेग कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






