Rahul Solapurkar l छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन सुटले होते, असे वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) याच्या पुण्यातील कोथरूड येथील घराबाहेर ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिवसैनिकांनी (Shiv Sainik) तीव्र आंदोलन सुरू केले आहे. “राहुल सोलापूरकर मला गावला, तर मी त्याला सोडणार नाही. त्याच्या तोंडाला काळं फासणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या या व्यक्तीला सुरक्षा कसली देता? त्याच्यावर कारवाई करायचं सोडून घराबाहेर पोलीस तैनात केले आहेत,” असे संतप्त वक्तव्य ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याने या आंदोलनात केले.
राहुल सोलापूरकरच्या अटकेची मागणी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त:
आंदोलकांनी सोलापूरकरच्या घराबाहेर ठिय्या दिला असून त्याला अटक करण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी “आम्हाला कशाला पकडता, त्याला अटक करा,” अशा घोषणा दिल्या. “सोलापूरकर भाजपच्या (BJP) मंचावर दिसतो, तो भाजपचे काम करतो का, म्हणून त्याला अटक करत नाही का?” अशा संतप्त भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. पोलिसांनी कोथरूड परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
सोलापूरकरने मागितली माफी; तरीही शिवप्रेमी संतप्त:
राहुल सोलापूरकरने बुधवारी समाज माध्यमावर एक व्हिडिओ पोस्ट करून, “माझे वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आले,” असा दावा करत माफी मागितली होती. मात्र, शिवप्रेमी अजूनही संतप्त असून त्यांनी सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
वादग्रस्त वक्तव्याचा मूळ मुद्दा:
राहुल सोलापूरकरने दिलेल्या मुलाखतीत, “छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंड्या दिल्या याचे पुरावे सुद्धा आहेत आणि ते आपल्याकडेच आहेत. त्यांनी औरंगजेबाचा वजीर आणि अगदी त्याच्या बायकोलासुद्धा लाच दिली होती,” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. “मोहसीन खान की मोईन खान नाव असलेल्या एका सरदाराकडून सही- शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतले आणि त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवत ते आग्र्यातून बाहेर पडले,” असेही तो म्हणाला होता.
आंदोलन चिघळण्याची शक्यता:
या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या काळात हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. शिवप्रेमींच्या भावना तीव्र असून, राहुल सोलापूरकरला अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.






