Weather Alert | देशभरात मान्सूनचं वेळीआधी आगमन झाल्यानंतर आता हवामान विभागानं पुन्हा एकदा अतिमुसळधार पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. भारताच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून, एकूण २० राज्यांना ‘हाय अलर्ट’वर ( Rain high alert) ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रालाही याचा तडाखा बसणार असून विदर्भासह काही भागांमध्ये पावसाच्या रूपानं संकट ओढावण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. (Maharashtra Weather Alert)
20 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट :
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, एक जूनपासून पुढील काही दिवस आसाम, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
यासोबतच वादळी वारे ताशी ७० किलोमीटर वेगानं वाहणार असल्याने या भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्येही विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Weather Alert | महाराष्ट्र आणि दक्षिण भारतालाही इशारा :
दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः केरळमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य प्रदेश, बिहारसह महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा देण्यात आला असून, विशेषतः विदर्भ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (Maharashtra Weather Alert)
या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडूनही खबरदारीचे उपाय सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित स्थळी थांबावं आणि अधिकृत सूचनांचं पालन करावं, असा सल्ला हवामान विभागानं दिला आहे.






