Share Market l भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने सेबीने घेतलेला ताजा निर्णय मोठा गेमचेंजर ठरू शकतो. परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी (FPI) प्रकटीकरणाच्या अटी शिथिल करत, आता फक्त ५० हजार कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असलेल्या संस्थांनाच विस्तृत माहिती देण्याचे बंधन राहणार आहे. यामुळे लहान व मध्यम स्तरावरील एफपीआयसाठी प्रवेश अधिक सुलभ होणार आहे.
परदेशी गुंतवणूकदारांसाठी नियम सुलभ :
या निर्णयामुळे गुंतवणुकीची प्रक्रिया सोपी होईल आणि भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणूक अधिक प्रमाणात आकर्षित होण्याची शक्यता आहे. याआधी ही मर्यादा २५ हजार कोटी रुपये होती, जी आता दुप्पट करण्यात आली आहे. सेबीचे नवनियुक्त अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे भारतीय शेअर बाजारात पारदर्शकता आणि स्थिरतेला चालना मिळेल, असे दिसून येते.
सेबीच्या निर्णयानंतर आता लहान एफपीआय संस्थांना विस्तृत माहिती देण्याची गरज उरणार नसल्याने त्यांचा भारतात गुंतवणुकीचा मार्ग सुकर होईल. यामुळे भारतीय बाजारात नवीन गुंतवणुकीसाठी मोठी संधी निर्माण होईल. यासोबतच पांडे यांनी स्पष्ट केले की, सेबीचे धोरण गुंतवणूकदारांना अडवण्याचे नाही तर त्यांना आकर्षित करण्याचे आहे.
एफपीआयसाठी भारतात एक सुलभ, पारदर्शक आणि गुंतवणूक-अनुकूल वातावरण तयार करणे हे सेबीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. विशेषतः बँकिंग, आयटी, आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट फायदा शेअर बाजारातील तेजीला होईल.
Share Market l शेअर बाजारावर दूरगामी परिणाम :
नवीन निर्णयांमुळे भारतात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची प्रक्रिया कमी होईल. हे लहान गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरणार असून, त्यांना भारतात प्रवेश करणे अधिक सोपे होईल. मोठे एफपीआय बहुतेक लार्ज कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही.
याशिवाय परकीय गुंतवणूक वाढल्यास रुपया मजबूत होण्याची शक्यता आहे. याचा फायदा तेल, वायू कंपन्यांना होईल तर आयटी आणि फार्मा क्षेत्राला काहीसा फटका बसू शकतो कारण त्यांचे उत्पन्न परकीय चलनात असते. मात्र एकंदरित बाजारासाठी ही सकारात्मक बातमी आहे.






