“तुला गोळ्या घालतो…”; साताऱ्यात पोलिसांसमोरच शेतकऱ्याला धमकी

On: April 10, 2025 2:28 PM
Satara
---Advertisement---

Satara | साताऱ्यातील (Satara) पोवई नाका भाजी मंडई परिसरात शेतकऱ्यांसाठी राखीव जागेवर व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाचा विषय चांगलाच पेटला आहे. या अतिक्रमणाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके (Raju Shelke) यांनी नगरपालिका अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तासह कारवाई केली. मात्र, याच कारवाईदरम्यान एका व्यापाऱ्याने राजू शेळके यांना “तुला गोळ्या घालतो” अशी थेट धमकी दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

“तुला गोळ्या घालतो…”

पोवई नाका परिसरातील भाजी मंडईत शेतकरी आणि व्यापारी यांच्यात जागेच्या वाटपावरून अनेकदा वाद निर्माण होत असतात. विशेषतः मंडईतील डाव्या बाजूच्या दोन रांगा केवळ शेतकऱ्यांसाठी राखीव असूनही, त्या जागेवर व्यापाऱ्यांनी टपऱ्या उभारून अतिक्रमण केले होते. शेतकऱ्यांनी हे अतिक्रमण थांबवावे अशी मागणी करताच त्यांनी थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी संपर्क साधला. राजू शेळके यांनी यासंबंधीची लेखी तक्रार नगरपालिकेकडे दिली. त्यानंतर बुधवारी सकाळी अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांसमोरच धमकीचा प्रकार, कायदा कुठे झोपला?

प्रशांत निकम यांच्या नेतृत्वात अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई करत असताना, एक व्यापारी संतप्त झाला. त्याने थेट शेळके यांना “गोळ्या घालीन तुला, कापून टाकेन एकेकाला” अशा स्वरूपात खुलेआम धमकी दिली. विशेष म्हणजे ही धमकी थेट पोलिसांच्या समोर दिली गेली असूनही, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी कोणतीही तात्काळ कारवाई केली नाही, हे विशेष लक्षवेधी ठरले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या प्रकारानंतर शेतकरी संघटनांत आणि स्थानिक नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. अशा व्यापाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. शेतकरी संघटनेकडून देखील संबंधित व्यापाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 Title: Satara Farmer Leader Gets Death Threat

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now