Santosh Deshmukh Murder | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशमुख यांना अमानुष पद्धतीने मारहाण करण्यासाठी वाल्मीक कराड गँगने चार खास हत्यारं बनवली होती. यासंदर्भातील धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमधून आरोपींच्या क्रूरतेचे नवीन तपशील उघड झाले आहेत. (Santosh Deshmukh Murder )
ही हत्या ९ डिसेंबर २०२४ रोजी झाली होती. संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांना निर्घृण मारहाण करण्यात आली. यामध्ये सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. याआधी हत्येचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामाही द्यावा लागला होता.
कोणती होती ही चार ‘खास’ हत्यारं?
काही मीडिया रिपोर्टनुसार, संतोष देशमुख यांना मारण्यासाठी जी हत्यारं वापरण्यात आली, ती खास बनवलेली होती. या हत्यारांमध्ये १) गॅस पाईप, २) गाडीच्या क्लच वायरपासून बनवलेला धातूचा चाबूक, ३) लाकडी बांबूची काठी, आणि ४) लोखंडी पाईप यांचा समावेश होता. या चार हत्यारांचा वापर करून देशमुख यांच्यावर एकामागोमाग एक हल्ले करण्यात आले.
या क्रूर मारहाणीत देशमुख यांच्या शरीरावर तब्बल 150 जखमा आढळून आल्या. आरोपींनी याआधीही इतर लोकांवर याच हत्यारांनी हल्ले केल्याची माहिती देखील समोर आली आहे. तीन डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने दिलेल्या अहवालात, या हत्यारांचा उपयोग केल्यास मृत्यू निश्चित आहे, असे नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
तपास यंत्रणेकडून आरोपपत्रात ठोस पुरावे
तपास यंत्रणेकडून आरोपींविरोधात जो आरोपपत्र सादर करण्यात आला आहे, त्यामध्ये या हत्यारांचे फोटोज आणि वैद्यकीय अहवाल जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आरोपींविरोधात पुरावे अधिक मजबूत झाले आहेत. ही हत्या पूर्वनियोजित आणि योजनाबद्ध असल्याचे या सर्व पुराव्यांवरून स्पष्ट होते.
संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्हा हादरून गेला होता. आता या नवीन खुलाशांमुळे प्रकरणात आणखी वळण येण्याची शक्यता आहे. राजकीय पातळीवरही या घटनेचे पडसाद उमटले होते. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
English Title: Santosh Deshmukh Murder Shocking Weapon Report Reveals






