संतोष देशमुख हत्येच्या व्हायरल फोटोंनी राज्यभर खळबळ, धनंजय मुंडेंचा आज राजीनामा?

On: March 4, 2025 8:54 AM
Dhananjay Munde
---Advertisement---

Santosh Deshmukh Murder Case |  बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, काल रात्री देवगिरीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असल्याची माहिती आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात. (Santosh Deshmukh Murder Case)

सीआयडीच्या आरोपपत्रातून मोठा खुलासा

संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता तीन महीने उलटले आहेत.  आरोपींनी क्रौर्याची सगळी सीमारेषा ओलांडत ही हत्या केली. या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) आणि गुन्हे अन्वेषण विभाग (CID) यांची स्थापना केली होती. शनिवारी सीआयडीने या प्रकरणात तब्बल 1800 पानी आरोपपत्र दाखल केले, ज्यातून वाल्मिक कराड हा हत्येचा मुख्य सुत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे आरोपपत्र दाखल होताच संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही अत्यंत संवेदनशील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या माध्यमातून आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत असून, संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे 8 फोटो आणि 15 व्हिडीओ समोर आले आहेत. या धक्कादायक फोटो आणि व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

धनंजय मुंडे आज राजीनामा देणार?

ही घटना समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कारण या हत्येचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. यापूर्वीही याच मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.

मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल होताच काल रात्री देवगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर मोठी चर्चा झाल्याची माहिती आहे.

राजकीय वातावरण तापणार?

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान हे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांकडून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Santosh Deshmukh Murder Case)

Title : Santosh Deshmukh Murder Case Will Dhananjay Munde Resign 

 

 

Join WhatsApp Group

Join Now