‘लायकी नव्हती त्यांना..’ ; 6 बंडखोर खासदारांवर संजय राऊतांचा हल्लाबोल

On: June 17, 2026 4:40 PM
Sanjay Raut
---Advertisement---

Sanjay Raut | ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांमागे केवळ पैशाचा मोह असल्याचा आरोप करत त्यांनी या नेत्यांवर नीतिमत्ता सोडल्याची टीका केली.

राऊत म्हणाले, “ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे त्यांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा. ज्या पक्षाने तुम्हाला खासदार बनवलं, निवडणूक लढवण्यासाठी संधी दिली, त्या पक्षाशी प्रामाणिक राहणं अपेक्षित आहे. राजीनामा देऊन कुठे जायचं ते जावं.”

“उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत, हा आरोप हास्यास्पद”

उद्धव ठाकरे कार्यकर्ते आणि खासदारांना वेळ देत नसल्याचा आरोप फेटाळताना राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे वेळ देत नसते तर तुम्ही निवडून आलात कसे? खासदार म्हणून तुमच्या मतदारसंघात काम करणं ही तुमची जबाबदारी आहे. ज्यांची ग्रामपंचायत सदस्य होण्याचीही लायकी नव्हती, अशा लोकांना पक्षाने खासदार केलं.”

“खासदार फुटण्यामागे पैसाच मोठं कारण”

ठाकरे गटातील खासदार दुसऱ्यांदा फुटल्याबाबत बोलताना राऊत यांनी गंभीर आरोप केले. “हे खासदार का जात आहेत, याचं उत्तर त्यांनी जनतेला द्यावं. त्यामागे पैसा हेच सर्वात मोठं कारण आहे. जे लोक आज पक्ष सोडत आहेत, त्यांच्यातच मंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू झाली आहे,” असा दावा त्यांनी केला.

“आम्ही संघर्ष केला, तरी पक्षाशी निष्ठा ठेवली”

स्वतःच्या अनुभवाचा उल्लेख करत राऊत म्हणाले, “मला तुरुंगात टाकलं, माझं घर जप्त करण्यात आलं, कुटुंबाला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. तरी आम्ही पक्षाशी निष्ठा ठेवली आणि लढत राहिलो. आम्ही छातीवर गोळ्या झेलू, पण झुकणार नाही.”

उद्याच्या बैठकीकडे लक्ष

ठाकरे गटाच्या खासदारांची उद्या बैठक होणार असून मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी व्हिप जारी केला आहे. या बैठकीत कोणते खासदार ठाकरे गटासोबत राहतात, याचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

शिंदे गटात जाण्याची चर्चा असलेले खासदार
संजय जाधव
संजय देशमुख
नागेश पाटील आष्टीकर
ओमराजे निंबाळकर
भाऊसाहेब वाकचौरे
संजय दिना पाटील

“पैसा आणि सत्तेच्या जोरावर फोडाफोडी”

राऊत यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधत, पैसा आणि सत्तेच्या बळावर पक्ष फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांबद्दल द्वेषातूनच या घडामोडी घडत असल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, ठाकरे गटातील या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांत आणखी घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News Title: Sanjay Raut Slams 6 MPs defect Shinde group Shiv Sena UBT MPs

Join WhatsApp Group

Join Now