Salman Khan | ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता सलमान खानने (Salman Khan) अखेर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या (Lawrence Bishnoi Gang) धमक्यांवर मौन सोडलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने आपल्या सुरक्षेविषयी फारसं न बोलता, नियतीवर विश्वास दाखवणारे सूचक शब्द उच्चारले.
“नियतीवर विश्वास आहे….”
पत्रकार परिषदेत जेव्हा सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमक्यांबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्याने आकाशाकडे हात करत शांतपणे उत्तर दिलं – “अल्लाह है, भगवान है… सगळं त्यांच्या हातात आहे. नियतीने माझ्या नशिबात जेवढं आयुष्य लिहलंय, तेवढंच आहे.”
त्याने पुढे सांगितलं, “कधी कधी इतक्या साऱ्या लोकांना सोबत घेऊन चालताना अडचणी निर्माण होतात.” मात्र, या मुद्द्यावर अधिक बोलण्याचे त्याने टाळले.
गोळीबार, धमक्या आणि सुरक्षा वाढ
1998 साली काळवीट शिकार प्रकरणानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर सलमान खान होता. गेल्या वर्षी त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाला. या घटनेनंतर सरकारने सलमानच्या सुरक्षेत मोठी वाढ केली. बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या आणि त्यातही बिश्नोई टोळीचा हात असल्याचं समोर आलं. त्यामुळे सलमानच्या कुटुंबीयांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं.
सलमान खानच्या वाढत्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ‘सिकंदर’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला स्थगिती देण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमानच्या घराबरोबरच पनवेलच्या फार्महाऊसची रेकी केल्याचं तपासात उघड झालं.
या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीतील 18 जणांवर सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही आरोपींनी पोलिसांसमोर कबुली दिली होती की त्यांनी सलमान खानला पनवेलमध्ये मारण्याचा प्लॅन केला होता.
Title: Salman Breaks Silence on Bishnoi Threats






