Rinku Rajguru | यूट्यूबर आणि उद्योजक कृष्णराज महाडिक (Krishnaraj Mahadik) आणि ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून चाहत्यांमध्ये चर्चा रंगली असून, दोघांचे नाते काय आहे, याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. विशेष म्हणजे, कृष्णराज महाडिक यांनी हा फोटो स्वतः आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला असून, त्यासोबत दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात दोघांची भेट
राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांच्या समाजसेवेसाठीही ते ओळखले जातात. नुकतेच त्यांनी अभिनेत्री रिंकू राजगुरूसोबतचा फोटो शेअर केला आणि त्यासोबत लिहिले, “युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले.”
हा फोटो काही वेळातच व्हायरल झाला आणि चाहत्यांच्या उत्सुकतेला उधाण आले. फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स येऊ लागल्या, काहींनी दोघांचे कौतुक केले, तर काहींनी थेट लग्नाबाबत प्रश्न विचारले.
लग्नाच्या चर्चांना उधाण, पण सत्य वेगळं
फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी दोघांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले. “लग्न ठरलंय का?”, “कोल्हापुरातच लग्न करणार का?” असे थेट प्रश्न चाहत्यांनी कृष्णराज महाडिक यांना विचारले. काहींनी तर दोघांचे अभिनंदनही करायला सुरुवात केली.
मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, रिंकू राजगुरू ‘राजर्षी शाहू महोत्सवात’ सहभागी होण्यासाठी कोल्हापुरात आली होती. महोत्सवानंतर तिने अंबाबाईचे दर्शन घेतले, त्याचवेळी कृष्णराज महाडिकही तिथे उपस्थित होते. योगायोगाने त्यांची भेट झाली आणि त्यांनी एकत्र फोटो काढला. मात्र, या भेटीचा कोणताही वेगळा अर्थ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.






