Resham Kaur Passes Away l सुप्रसिद्ध सूफी गायक आणि भाजपचे माजी खासदार हंसराज हंस यांच्या पत्नी रेशम कौर यांचं बुधवारी (२ एप्रिल २०२५) निधन झालं. त्या ६२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर दिल्लीतील टागोर रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी दुपारी १ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अचानक आलेला हृदयविकाराचा झटका :
रेशम कौर यांना काही दिवसांपूर्वी अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या पाच दिवसांपासून त्या अतिदक्षता विभागात उपचार घेत होत्या. अखेर, डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आलं नाही. त्यांच्या भाऊ परमजीत सिंग यांनी या बातमीची पुष्टी केली.
हंसराज हंस आणि रेशम कौर यांचा लग्नाचा वाढदिवस १८ एप्रिल रोजी साजरा होणार होता. मात्र, त्याआधीच रेशम यांनी या जगाचा निरोप घेतल्याने हंस कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय आणि कलाविश्वातील व्यक्तींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Resham Kaur Passes Away l दलेर मेहंदी यांचे व्याही :
रेशम आणि हंसराज हंस हे सुप्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांचे व्याही आहेत. त्यांच्या मुलगा नवराज हंस याचं लग्न दलेर मेहंदी यांची कन्या अजीत कौर हिच्यासोबत झालं आहे. हंसराज हंस यांना दोन मुले आहेत – युवराज आणि नवराज हंस, दोघेही संगीत आणि मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहेत.
रेशम कौर यांच्यावर गुरुवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हंस कुटुंबीयांच्या दिल्लीतील निवासस्थानी नातेवाईक, चाहत्यांसह अनेक प्रसिद्ध कलाकार आणि राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.






