Ladki Bahin Yojana | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभात आता कपात करण्यात येणार आहे. ज्या महिला ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना ‘लाडकी बहीण’ (Ladki Bahin Scheme) योजनेतून पूर्ण दीड हजार रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिळणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे दुहेरी लाभ घेता येणार नाही.
शासकीय योजनेचा दुहेरी लाभ नाही
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना (Ladki Bahin Scheme) जुलै २०२४ पासून सुरू झाली असून, पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. निवडणुकीपूर्वी ही रक्कम २१०० रुपये करण्याची घोषणा झाली होती, पण ती अद्याप अमलात आलेली नाही. सुरुवातीला अनेक महिलांनी अर्ज केले होते व त्यांना लाभ देणे सुरू झाले होते. मात्र, नंतर सरकारने कर भरणारे आणि चारचाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेतून वगळले.
आता सरकारने नवीन धोरणानुसार, इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा पूर्ण लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार, ‘नमो शेतकरी’ योजनेतून वर्षाला १२ हजार रुपये मिळणाऱ्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून आता केवळ उर्वरित ५०० रुपयेच मिळतील.
Ladki Bahin Yojana | अर्ज पडताळणी अंतिम टप्प्यात
या नवीन नियमामुळे अर्जांची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ च्या शासन निर्णयानुसार, इतर शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांनाच पूर्ण १५०० रुपये सन्मान निधी दिला जात आहे. ‘नमो शेतकरी’ योजनेचा लाभ घेणाऱ्या ७,७४,१४८ महिलांना केवळ ५०० रुपयांचा फरक दिला जात आहे.
याशिवाय, संजय गांधी निराधार योजनेचा (Sanjay Gandhi Niradhar Yojana) लाभ घेणाऱ्या महिलांनाही या योजनेतून वगळण्यात येत आहे. अनेक महिला स्वतःहून महिला व बालविकास विभागाकडे अर्ज करून ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ नको असल्याचे कळवत आहेत आणि योजनेतून बाहेर पडत आहेत.






