RBI Action | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) बँकिंग क्षेत्रातील नियमभंग प्रकरणांवर सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आरबीआयने तीन मोठ्या बँकांवर कारवाई करत आर्थिक दंड ठोठावण्याला आहे. नियमांचे उल्लंघन आणि प्रक्रियात्मक त्रुटींमुळे या बँका आरबीआयच्या रडारवर आल्या आहेत. (RBI Action )
आरबीआयच्या अधिकृत माहितीनुसार, कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank), IDFC फर्स्ट बँक (IDFC First Bank) आणि पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) या तीन प्रमुख बँकांनी विविध बँकिंग मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात गंभीर त्रुटी केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर लाखो रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.
कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँकेने कर्ज आणि अॅडव्हान्सेस संदर्भातील मार्गदर्शक सूचना, वैधानिक बंधने आणि काही आवश्यक धोरणांचं पालन केलं नाही. त्यामुळे आरबीआयने या बँकेवर ₹61.4 लाखांचा दंड ठोठावला आहे.
IDFC फर्स्ट बँक
IDFC फर्स्ट बँकेने ग्राहकांच्या KYC नियमांचे पालन न केल्यामुळे ₹38.6 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. KYC ही बँकिंग प्रणालीतील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे, जी आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता राखते.
PNB
पंजाब नॅशनल बँकेने ग्राहक सेवेसंदर्भातील काही मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने त्यांच्यावर ₹29.6 लाखांचा दंड लावला आहे. ग्राहक सेवा ही बँकिंग क्षेत्रात विश्वास टिकवण्याचा कणा असून, त्यात त्रुटी असल्यास दंडात्मक कारवाई अनिवार्य ठरते.
या कारवाईच्या आधीच, कलर मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँक (Ahmedabad) या बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला होता. आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत झाल्यामुळे आणि ठेवीदारांचे हित सुरक्षित ठेवण्यासाठी ही कठोर पावलं उचलण्यात आली होती. (RBI Action )
या सलग कारवायांमधून आरबीआयने स्पष्ट संदेश दिला आहे की, कोणतीही बँक कितीही मोठी असली, तरी नियमांचे उल्लंघन केले तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल. बँकिंग शिस्त आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी नियमन यंत्रणा बळकट करण्याची ही पावले महत्त्वपूर्ण ठरतात.
Title : RBI Action Heavy Penalties on Kotak, IDFC, PNB






