Rahul Gandhi | राजकीय नेत्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांना मोठी उत्सुकता असते, विशेषतः जेव्हा विषय त्यांच्या विवाहाचा असेल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या लग्नाबाबत सातत्याने चर्चा रंगत असते. मात्र, नुकत्याच एका लग्नपत्रिकेमुळे खळबळ उडाली आहे. या पत्रिकेवर चक्क राहुल गांधी आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे फोटो छापण्यात आले असून, सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राहुल गांधींच्या फोटोमुळे चर्चा-
मध्य प्रदेश युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस योगेश दंडोटिया (Yogesh Dandotiya) यांच्या बहिणीच्या लग्नासाठी छापलेल्या पत्रिकेवर राहुल गांधी(Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी यांचे फोटो झळकत आहेत. विशेष म्हणजे, या कार्डच्या मुखपृष्ठावर संविधान निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर (B.R. Ambedkar) यांचा फोटो देखील आहे. या अनोख्या लग्नपत्रिकेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

याबाबत स्पष्टीकरण देताना योगेश दंडोटिया यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करून दलित आणि मागासवर्गीयांना समाजात समान अधिकार मिळवून दिले. त्याचप्रमाणे, राहुल गांधी आज संविधानाच्या रक्षणासाठी लढा देत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी असलेल्या श्रद्धेचे प्रतिक म्हणून त्यांचा फोटो पत्रिकेवर छापण्यात आला आहे.
भाजपकडून राहुल गांधींवर टोलेबाजी-
या अनोख्या लग्नपत्रिकेवर भाजपने टीका करत राहुल गांधींची खिल्ली उडवली. भाजप नेते रामेश्वर भदोरिया (Rameshwar Bhadoriya) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या लग्नाची अधिकृत पत्रिका अद्याप छापली गेली नाही, पण किमान कोणाच्या तरी लग्नपत्रिकेवर तरी त्यांचा फोटो झळकला आहे!”
भाजपने टोमणा मारत राहुल गांधींच्या लग्नाची प्रतीक्षा असल्याचे म्हणत, त्यांच्या लग्नाची पत्रिका लवकर छापली जावी आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुरू व्हावे, अशी मिश्कील प्रार्थना केली. सोशल मीडियावर हा विषय जोरदार चर्चेत असून, राहुल गांधी यांच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.






