Pune | स्वारगेट (Swargate Bus Depot) बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatraya Gade) याने स्वतःला त्या बसचा वाहक असल्याचे खोटे सांगून पीडित तरुणीची फसवणूक केली. विशेष म्हणजे, ही बस स्वारगेट ते सोलापूर मार्गावर विनावाहक धावत होती. त्यामुळेच आरोपीने संधी साधत या अमानुष कृत्याला अंमलात आणल्याचे उघड झाले आहे.
बस ड्रायव्हरचा जबाब; आरोपी अद्याप फरार
मंगळवारी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी एसटी बस (एच 06 BW 0319) स्वारगेट आगारात दाखल झाली. पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास आरोपीने ही घटना घडवली. फलटणला जाणाऱ्या तरुणीला त्याने आपल्या जाळ्यात ओढले. आपण त्या बसचा वाहक असून गेली १५ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याचे त्याने सांगितले आणि तिला बसमध्ये नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर अमानुष अत्याचार केला.
या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके सक्रिय झाली आहेत.
स्वारगेट बस डेपोतील २३ सुरक्षारक्षक निलंबित
या गंभीर घटनेनंतर राज्य सरकारने तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी स्वारगेट बस डेपोमधील २३ सुरक्षारक्षकांना तात्काळ निलंबित केले आहे. तसेच गुरुवारपासून नवीन सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय, डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रकांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या चौकशीचा अहवाल आठवड्याभरात सादर करण्यास सांगितले असून, अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याचे आदेशही मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.
स्वारगेट स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
या प्रकरणानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. गर्दीच्या स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्कार होतो, यावरून सुरक्षेची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
या घटनेनंतर शिवसेनेच्या (Uddhav Balasaheb Thackeray) कार्यकर्त्यांनी स्वारगेट बस स्थानकात आंदोलन केले. वसंत मोरे (Vasant More) यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सुरक्षा व्यवस्थेवर आक्रमक भूमिका घेत, सुरक्षा रक्षकांच्या केबिनच्या काचाही फोडल्या.
याशिवाय, स्वारगेट बसस्थानकातील बंद बसमध्ये मोठ्या प्रमाणावर कंडोम, जुने कपडे, साड्या आणि शर्ट आढळून आले आहेत, हे वास्तव समोर आल्यानंतर बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.






